जळगाव जिल्ह्यात औषधी, सुगंधी वनस्पती लागवडीला सरकार देणार 60 लाखांचे अनुदान

गावशिवार न्यूज | पाल ते पाटणा देवी या परिसीमेत समाविष्ट असलेल्या जळगाव जिल्ह्यात ‘आरोग्य धनसंपदा-Health Is Wealth’ च्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांना कापूस, केळी, ऊस या पिकांशिवाय औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीकरीता केंद्र सरकारकडून सुमारे 60 लाख रूपयांचे अनुदान मिळू शकणार आहे. जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांनी त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. (MP Unmesh Patil)

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारने आयुष मंत्रालयाची स्थापना करून विविध प्रकारच्या योजना लागू केल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर सातपुड्यातील पालपासून पाटणा देवीपर्यंतच्या परिसीमेत असलेल्या जळगाव जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या औषधी व सुगंधी वनस्पती पिकांकरीता सरकारच्या कोणत्या योजना आहेत आणि त्यासाठी शासनाकडून किती निधी मिळतो, याबाबतचा प्रश्न खासदार उन्मेश पाटील यांनी अधिवेशनात उपस्थित केला होता. खासदारांच्या त्या प्रश्नाचे उत्तर देताना केंद्रिय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी स्पष्ट केले, की राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे गट तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्र येऊन मागणी केल्यास त्यांना औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी जास्तीत जास्त 1 कोटी 20 लाख रूपयांचा प्रस्ताव सादर करता येईल. त्यापैकी 60 लाख रूपयांचे अनुदान औषधी व सुगंधी वनस्पती लागवड, साहित्य खरेदीसाठी उपलब्ध होऊ शकेल. याशिवाय सुमारे 27 लाख रूपयांचे अनुदान प्रशिक्षण, काढणी पश्चात तंत्रज्ञान व मूल्यवर्धन याबाबींकरीता उपलब्ध केले जाईल. अर्थात, अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांनी संघटितपणे अर्ज करणे महत्वाचे आहे.

WhatsApp Group
Previous articleरविवार (ता. 04 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव
Next article2 एकरात 3 लाखांची कमाई…खरबूज पीक ठरले कपाशीपेक्षा सवाई