राज्यात शेतकऱ्यांना बांबू रोपांकरीता शासन देणार ‘इतके’ अनुदान

गावशिवार न्यूज | राज्य शासनाने बांबू लागवडीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला असताना शेतकऱ्यांना नेमके किती आणि कोणत्या प्रकारे अनुदान मिळणार, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेला आहे. तर शासन हे अटल बांबू समृद्धी योजनेंतर्गत टिश्यू कल्चर बांबू रोपे पुरवठा व देखभालीसाठी शेतकऱ्यांना प्रति रोप दरवर्षी सुमारे 175 रूपयांचे अनुदान देणार आहे. (Bamboo Farming)

राज्यातील शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रोत्साहन देऊन बांबूचे क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने सोमवारी (ता.05) शासनाकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बांबू अभियानाच्या धर्तीवर राज्यात अटल बांबू समृद्धी योजना राबवून बांबुच्या टिश्यूकल्चर रोपांच्या लागवडीकरीता अनुदान देण्याचा प्रस्ताव वन विभागाने आणला होता. त्यास मंत्रिमंडळाने आता मान्यता दिली असून, बांबू रोपे पुरवठा व देखभालीसाठी शेतकऱ्यांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी प्रति रोप सुमारे 350 रूपये खर्च गृहीत धरून निम्मे रक्कम अनुदान स्वरूपात देण्याचे ठरले आहे. या योजनेच्या माध्यमातून एका लाभार्थी शेतकऱ्याला दोन हेक्टरच्या मर्यादेत 600 रोपे प्रति हेक्टरप्रमाणे 1200 बांबू रोपे लागवड व देखभालीसाठी देण्यात येणार आहेत. अर्थात, बांबू रोपांच्या अनुदानासाठी शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी समुहाला प्राधान्य देण्यात येणार आहे. वैयक्तिक शेतकऱ्यांचाही अनुदानासाठी विचार केला जाणार आहे. प्राप्त माहितीनुसार अटल बांबू समृद्धी योजनेच्या अंमलबजावणीकरीता प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली जाणार आहे.

WhatsApp Group
Previous articleमंगळवार (ता. 06 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव
Next articleजाणून घ्या, लाभार्थींना कसा मिळेल ? ‘मधाचे गाव’ योजनेचा लाभ