गावशिवार न्यूज | राज्यभरात आतापर्यंतच्या चालू हंगामात 207 साखर कारखान्यांकडून सुमारे 7.5 कोटी मेट्रिक टन उसाचे गाळप झाल्याची माहिती साखर आयुक्तालयाने दिली आहे. प्राप्त माहितीनुसार मोठ्या क्षमतेच्या 42 कारखान्यांमधून तीन कोटी मेट्रिक टनापेक्षा जास्त तसेच उर्वरित 165 कारखान्यांकडून चार कोटी मेट्रिक टनांपेक्षा जास्त उसाचे गाळप झाले आहे. (Sugarcane Crushing)
दरम्यान राज्यात झालेला अवकाळी पाऊस ऊस शेतीच्या पथ्यावर पडला आहे. त्यामुळे ऊसाच्या वजनात वाढ झाल्याने गाळपाचे प्रमाण 10 टक्क्याने वाढेल, असा अंदाज देखील साखर आयुक्तालयाने व्यक्त केला आहे. राज्यात यंदा सुमारे 14 लाख हेक्टर उसाची गाळप हंगामासाठी नोंद झाली होती. त्यातून उत्पादित झालेल्या सुमारे 748 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप आतापर्यंत शक्य झाले आहे. सद्यःस्थितीत 207 साखर कारखाने उसाचे गाळप करीत असले तरी सर्वाधिक क्षमतेच्या 42 कारखान्यांनी 3 कोटींपेक्षा जास्त उसाचे गाळप करून आघाडी मिळवली आहे. उर्वरित 135 साखर कारखान्यांचे 4 कोटी टनांपेक्षा जास्त गाळप झाले असल्याची माहिती साखर आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.