अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल- अजित पवार

Ajit Pawar : अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी येथे अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली आहे. शेतकऱ्यांसाठी संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. हा प्रकल्प येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर ठरेल, असाही विश्वास उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी व्यक्त केला.

वरुड-मोर्शी येथे अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याबाबत आढावा बैठक उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेण्यात आली. त्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की अमरावती विभागात संत्रा लागवडीचे क्षेत्र जास्त आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना रास्तभाव मिळणे गरजेचे आहे. संत्र्यांवर अत्याधुनिक सयंत्राद्वारे प्रक्रिया करून ज्यूस कॉन्सट्रेट, इसेन्स‍ियल ऑइल, पिल पावडर, पशु खाद्य, ज्यूस, टेट्रापॅक ज्यूस, पेंट बॉटल इत्यादी प्रकारची वेगवेगळी उत्पादने केल्यास संत्रा फळाची मूल्यवृद्धी होऊन त्यापासून शेतकऱ्यांना चांगला अतिरिक्त मोबदला मिळू शकतो.

यावेळी आमदार देवेंद्र भुयार, पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे संचालक मंगेश गोंदवले, पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. केदार जाधव, अमरावती कृषी विभागाचे सहसंचालक के. एस. मुळे, विदर्भ ॲग्रोव्हिजन प्रोड्यूसर कंपनीचे अमित जिचकर यांच्यासह महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ आणि पणन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

WhatsApp Group
Previous articleजळगावमध्ये कृषी समित्यांची आढावा बैठक दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी होणार
Next articleराज्यभरात सकाळी गारठा आणि दुपारी उन्हाचे चटके जाणवू लागले