Onion Ban : केंद्र सरकारने 31 मार्च 2024 पर्यंत लादलेली कांदा निर्यातबंदी अखेर हटविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, केंद्रीय सहकारी मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या समितीने कांदा निर्यातीला हिरवी झेंडी दाखवितानाच 03 लाख मेट्रीक टनाची अट घातली आहे. यासोबतच बांगलादेशमध्ये 50 हजार टन कांदा निर्यातीलाही मान्यता देण्यात आली आहे.
केंद्राने कांदा निर्यातबंदी लागू केल्यानंतर राज्यातील विविध ठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दर पडल्याने शेतकऱ्यांना मातीमोल किंमतीत कांदा विक्री करावा लागत होता. त्यामुळे कांदा उत्पादकांना ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलने देखील केली. यापार्श्वभूमीवर पुन्हा कांद्याची परिस्थिती पाहण्यासाठी केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक 6 ते 9 फेब्रुवारीच्या कालावधीत महाराष्ट्रात कांदा पाहणीसाठी येऊन गेले. त्यानंतर लगेच कांदा निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दरम्यान गुजरात आणि महाराष्ट्रातील कांद्याचा साठा आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबतची माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना दिली होती. त्यानंतरच ही बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उशिरा का होईना शेतकरी हिताचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)