Banana Export : कृषी आणि प्रक्रिया केलेली अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण म्हणजेच अपेडाच्या माध्यमातून भारत देशाने रशियाला समुद्रमार्गे केळी निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय सम-उष्णकटिबंधीय फलोत्पादन संस्था अर्थात सीआयएसएच यांच्या सहकार्याने अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी नुकत्याच महाराष्ट्रातून केळीच्या सुमारे 1 हजार 540 पेट्या रवाना केल्या आहेत.
रशियाने भारतातून केळीसोबतच उष्ण कटिबंधीय फळांच्या खरेदीत उत्सुकता दाखवली आहे. केळी ही रशियाची प्रमुख कृषी आयात आहे. रशिया सध्या लॅटिन अमेरिकन देश इक्वाडोरमधून केळीची आयात करतो आहे. समुद्रमार्गे केळी निर्यातीला चालना मिळाल्यानंतर रशियाच्या रूपाने केळीचा मोठा आयातदार देश हा भारताचा ग्राहक बनणार आहे. जगात भारत हा प्रमुख केळी उत्पादक देश असून, सध्या भारतातून आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात केळीची निर्यात देखील केली जाते. आगामी काळात अमेरिका, रशिया, जपान, ब्रिटन, फ्रान्स, चीन, जर्मनी आदी देशांमध्ये सागरी मार्गाने केळीची निर्यात केंद्र सरकार वाढविणार आहे. त्यामाध्यमातून सुमारे एक अब्ज डॉलर्स म्हणजेच तब्बल 8,300 कोटी रूपये कमावण्याचा उद्देश सरकारचा आहे. त्यानुसार नेदरलँड देशाला सागरी मार्गाने केळीची पहिली खेप पाठविण्याचा प्रयोग करण्यात आला. त्यात अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्यानंतर केंद्राने आगामी पाच वर्षात सागरी मार्गाने विविध देशात केळीची निर्यात करण्याचा मास्टर प्लान तयार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता रशियासारख्या देशालाही भारतातून समुद्रमार्गे केळी पाठविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे.
सागरी मार्गाने निर्यात वाढविण्याकरीता अपेडाने तयार केले प्रोटोकॉल
टिकवण क्षमता कमी असल्याचे लक्षात घेऊन भारतातून एरवी हवाई मार्गाने विदेशात केळी निर्यात केली जाते. त्यापुढे जाऊन सागरी मार्गाने केळी निर्यातीची शक्यता केंद्र सरकारने नुकतीच पडताळून पाहिली. अपेडाच्या माध्यमातून केळी निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी इतर भागधारकांना सोबत घेऊन अलिकडे प्रोटोकॉल देखील विकसित केले आहेत. त्या प्रोटोकॉलमध्ये केळीसाठी सागरी मार्गाने निर्यात होत असताना प्रवासाचा एकूण वेळ समजून घेणे, ठराविक वेळी फळांची काढणी करणे, केळी पिकण्याच्या कालावधीचे मोजमाप करणे या गोष्टींचा अभ्यास केला गेला आहे. आगामी काळात त्यासाठी केळी उत्पादकांनाही प्रशिक्षित केले जाणार आहे. केळीसोबत आंबा, डाळिंब, जॅकफ्रूट यासारख्या फळांची व भाजीपाला पिकांची सागरी मार्गाने निर्यात वाढविण्याकरीता सुद्धा अपेडा आता प्रोटोकॉल तयार करण्याचे काम करीत आहे. त्यात यश आल्यानंतर भारतीय शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली फळे व भाजीपाला यांना चांगले मूल्य मिळण्याची शक्यता वाढली आहे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)