गावशिवार न्यूज । वातावरणातील बदलामुळे सातत्याने नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांना पीकविमा योजनेतून मिळणारी भरपाई वाढवून देण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार शासनाने हवामानावर आधारीत फळ पीकविमा योजनेची पुनर्चरना करून विशेषतः केळी पिकाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना हेक्टरी सुमारे 01 लाख 70 हजार रूपयांची भरपाई मिळेल, अशी व्यवस्था आता केली आहे. त्यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय देखील काढण्यात आला आहे. (Crop Insurance)
01 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारीच्या कालावधीतील कमी तापमान, तसेच 01 मार्च ते 31 जुलैच्या कालावधीतील वेगाने वाहणारे वारे आणि 01 एप्रिल ते 31 मे कालावधीतील जास्तीचे तापमान, या हवामान घटकांपासून नुकसान झाल्यास यापूर्वी केळी उत्पादकांना हेक्टरी 01 लाख 30 रूपये एवढी भरपाई पीकविमा पीकविमा योजनेतून मिळत असे. मात्र, यापुढे वरील हवामान घटकाच्या निकषानुसार परिस्थिती आढळून आल्यास केळी उत्पादकांना हेक्टरी सुमारे 01 लाख 70 हजार रूपये इतकी आर्थिक भरपाई मिळू शकणार आहे.
विशेष म्हणजे केळीला जादा व कमी तापमान, या हवामान धोक्याच्या कालावधीचा लाभ देताना यापूर्वी सलग तीन दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांची अट होती. मात्र, हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेत सुधारणा झाल्यानंतर आता सलग तीन दिवसापैकी मधल्या कोणत्याही एका दिवशी जादा तसेच कमी तापमानात 0.5 अंश सेल्सिअसची तफावत आली तरी नुकसान भरपाई ग्राह्य धरली जाणार आहे. याशिवाय गारपिटीने केळी बागांचे नुकसान झाल्यानंतर हेक्टरी 57 हजार रूपयांची वेगळी नुकसान भरपाई मिळणार आहे. परंतु, त्यासाठी स्वतंत्र विमा हप्ता भरावा लागणार आहे. खास बाब म्हणजे केळी उत्पादक शेतकऱ्यांना आता वार्षिक 8,500 रूपये हप्ता भरावा लागेल, जो याआधी 10,500 रूपये इतका होता.