उद्योजिका कमलताई परदेशी यांच्या निधनाने गाव खेड्यातील महिलांचा आधारवड कोसळला

गावशिवार न्यूज | अंबिका मसाले उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातील महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या व ग्रामीण महाराष्ट्रातील मसाल्यांची अस्सल चव जगभर पोहोचवणाऱ्या उद्योजिका कमलताई परदेशी यांच्या निधनाने गाव खेड्यातील महिलांचा आधारवड कोसळला आहे. त्यांच्या निधनाने मराठी उद्योग जगतातील प्रयोगशील व कर्तृत्वान महिलेचे (Accomplished woman) व्यक्तिमत्त्व हरपले आहे.

लोणची, चटणी आणि विविध प्रकारच्या मसाल्यांच्या व्यवसायातून ग्रामीण महाराष्ट्राच्या मसाल्यांची अस्सल चव कमलताईंनी जगभर पोहोचवली. अंबिका मसाले उद्योगाच्या माध्यामातून ग्रामीण भागातील हजारो महिलांच्या हाताला रोजगार देण्याचे, त्यांना आत्मनिर्भर करण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले. शेतमजूर ते उद्योजिका असा कमलताईंचा प्रवास थक्क करणारा होता. आपल्या उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राचे नाव जगाच्या नकाशावर ठळक केले. कमलताई परदेशी ह्या दौंड येथील अंबिका महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या चेअरमन होत्या.

वार्षिक उलाढाल सुमारे 80 कोटी रूपये

कमलताई परदेशी यांनी घरगुती पातळीवर सुरू केलेल्या लहान लघू उद्योगाचे रूपांतर नंतर एका बहुउद्देशीय औद्योगिक कंपनीत झाले. त्यांना अथक परिश्रमातून नावारूपाला आणलेल्या अंबिका मसाले ब्रँन्डच्या माध्यमातून आज 42 प्रकारचे मसाले तयार केले जातात. उच्च दर्जा कायम राखल्याने त्यांच्या मसाल्यांना ताजसारख्या नामांकित हॉटेल्समध्ये व बाजारात कायम मागणी राहिली. आज अंबिका मसाले या कंपनीची वार्षिक उलाढाल सुमारे 80 कोटी रूपयांची आहे. कधी दुसर्‍याच्या शेतात मजुरी करणार्‍या एका स्त्रीने तिच्यासारख्याच 200 महिलांना अंबिका मसाले उद्योगातून हक्काचा रोजगार उपलब्ध करून दिला. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील तब्बल 56 पुरस्कार कमलताईंना त्यामुळे प्रदान करण्यात आले होते.

WhatsApp Group
Previous articleराज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन किर्तनकारांची मदत घेणार
Next articleभारतासाठी चिंतेचा विषय, 2023 हे सव्वाशे वर्षातले दुसरे सर्वात उष्ण वर्ष