काय सांगता ? कांदा आता साडेसात महिन्यांपर्यंत खराब होणार नाही !

Agriculture Breaking News : अस्थिर बाजारभाव आणि कमी टिकवण क्षमता असलेल्या कांद्याची शेती ही शेतकऱ्यांना श्रीमंत करते किंवा रस्त्यावरही आणते. याअनुषंगाने काढणी झालेल्या कांद्याचे सरासरी आयुष्य साडेसात महिन्यांपर्यंत वाढविण्यासाठी भाभा अणू संशोधन केंद्राने नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याची चाचणी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत यशस्वी देखील झाली आहे.

Onion will not spoil for seven and a half months now

टंचाईच्या काळात बाजारात कांदा चांगलाच भाव खातो. मागणीपेक्षा जास्त पुरवठा झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोठ्या मेहनतीने पिकवलेला कांदा रस्त्यावर सुद्धा फेकावा लागतो. बाजारातील मागणी व पुरवठा यांचा ताळमेळ साधण्यासाठी बरेच शेतकरी चाळींमध्ये कांदा साठविताना दिसतात. मात्र, तिथेही वजनात घट येण्यासह कुजणे आणि कोंब येण्यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे चाळीत कांदा साठविणे शेतकऱ्यांसाठी खूपच जोखमीचे ठरते. यापार्श्वभूमीवर भाभा अणू संशोधन केंद्राने कांद्यावर विकीरण प्रक्रिया करण्याचे तंत्र शोधून काढले आहे. रेडिएशनच्या साहाय्याने कांद्याचे आयुष्य वाढविण्यासाठी काढणीनंतर एक महिन्याच्या आत विकीरण प्रक्रिया केली जाते. त्याची प्रत्यक्ष चाचणी लासलगाव बाजार समितीच्या कृषकमध्ये करण्यात आली असून, त्यामुळे कांद्याचे आयुष्य साडेसात महिन्यांपर्यंत वाढविता येत असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. विशेष म्हणजे कांद्यावर रेडिएशनची प्रक्रिया करण्यासाठी प्रतिकिलो फक्त एक रूपया खर्च शेतकऱ्यांना येणार आहे. रेडिएशनची प्रक्रिया केलेला कांदा दीर्घकाळ टिकणार असल्याने कांद्याचे खराब होण्याचे प्रमाण जेमतेम 3 टक्केच असू शकणार आहे.

शेतकऱ्यांना 250 टन कांद्यावर विनामूल्य रेडिएशन प्रक्रिया करून मिळणार
कांद्यावरील विकीरण प्रक्रियेतील रेडिएशनचे तंत्र हे खाद्य पदार्थांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे रेडिएशनची प्रक्रिया केलेला कांदा खाण्यास काहीएक अडचण येणार नाही. लासलगावात सुरू करण्यात आलेल्या पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्तावर सुमारे 250 टन कांद्यावर विनामूल्य रेडिएशनची प्रक्रिया करून मिळणार आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी लासलगावात नुकतेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन सुद्धा केले होते. यावेळी भाभा अणूसंशोधन केंद्राचे संचालक विवेक भसीन, माजी संचालक डॉ.घंटी, फूड टेक्नॉलॉजी विभागाचे मुख्य डॉ. सत्येंद्र गौतम, महाराष्ट्र राज्य कृषी अधिकारी बाळकृष्ण सूर्यवंशी, अनुजा केंद्राच्या सहसचिव सुषमा शेटे आदी उपस्थित होते.

WhatsApp Group
Previous articleशरद पवारांनी आंदोलनाची भाषा करताच कांद्यासाठी फडणवीसांचे केंद्राला साकडे
Next articleउद्या सोमवारी (ता.11 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव