Agriculture Commissioner Action : शेतकऱ्यांच्या सोयीसाठी नेमलेला परंतु शेतकऱ्यांना कधीही न भेटणारा कृषी सहाय्यक शासनाचा पगार घेऊन मजा मारत होता. राज्याचे कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी अखेर त्याला निलंबित केले आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Direct suspension action by commissioner on agricultural assistant
राज्याचे कृषी आयुक्त डॉ. गेडाम हे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यामुळे अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते हे आवर्जून उपस्थित होते. वरूड तालुक्यातील बारगाव परिसरात कृषी आयुक्तांनी भेट दिली तेव्हा त्या भागाची जबाबदारी असलेले कृषी सहाय्यक कुठे आहेत, असा प्रश्न आयुक्तांनी विचारला. मात्र, वरूड तालुक्यातील बारगाव, जामगाव, खडका. आंबाफाटा आदी काही गावांची जबाबदारी असलेले कृषी सहाय्यक विजय गावंडे यांचा तिथे पत्ता नव्हता. त्यामुळे कृषी आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, यावेळी काही शेतकऱ्यांनी तक्रार केली की संबंधित कृषी सहाय्यक हे कधीच शेतकऱ्यांना भेटत नाही. स्थानिक रहिवासी असुनही ते शासनाचा पगार घेऊन आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत नाही. त्यामुळे कृषी विभागाच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात मोठी अडचण येते. ही बाब कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना खटकली. त्यांनी तातडीने आदेश काढून कामचुकार व दांडी बहाद्दर कृषी सहाय्यकाला निलंबित करण्याची कार्यवाही पूर्ण केली. दरम्यान, दोषी कृषी सहाय्यकाच्या गैरहजेरीबद्दल आयुक्तांनी जाब विचारल्यानंतर कृषी विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी ते चहा घेण्यासाठी बाहेर गेल्याचे सांगून बचाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिथे उपस्थित शेतकऱ्यांनी ते गावात कधीच थांबत नाही आणि आजही ठिकाणावर नसतील, असे सांगितले. त्यामुळे आपल्याच खात्यातील कर्मचाऱ्याची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर कृषी आयुक्तांनी दांडी बहाद्दर कृषी सहाय्यकाला तातडीने निलंबीत करण्याचे आदेश काढले.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)