जिल्हा कृषी महोत्सवांचे आयोजन करण्यासाठी 3.4 कोटी रूपयांची तरतूद

गावशिवार न्यूज | शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती, शेतीचे संशोधन, तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण प्रयोग, बाजारपेठ व्यवस्थापन, शेतीपूरक व्यवसायांचे मार्गदर्शन मिळावे. तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले अन्नधान्य उत्पादक ते ग्राहक संकल्पनेतून विकले जावे म्हणून राज्यात जिल्हा कृषी महोत्सवांचे आयोजन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्याकरीता सन 2023-24 साठी सुमारे 3.4 कोटी रूपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे. (Agriculture Exhibition)

मुंबई आणि मुंबई उपनगर वगळता राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये दरवर्षी पाच दिवसीय जिल्हा कृषी महोत्सवांचे आयोजन करण्यास 16-10-2020 च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार सन 2023/24 करीता जिल्हा कृषी महोत्सव योजनेंतर्गत सुमारे 6.80 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात सिल्लोड येथे आयोजित कृषी महोत्सवासाठी सुमारे 54 लाख 71 हजार रूपये इतका निधी यापूर्वीच वितरीत करण्यात आला आहे. याशिवाय एकूण अर्थसंकल्पित निधीतून 81 लाख 28 हजार रूपये निधी वितरीत करण्यात आला होता. सदर निधी वगळता राज्यभरात जिल्हा कृषी महोत्सवांचे आयोजन करण्यासाठी आता 5.44 कोटी रूपये निधी शिल्लक आहे आणि तो वितरीत करण्याची विनंती आत्माच्या संचालकांनी केली होती. परंत, 12 एप्रिल 2023 च्या शासन निर्णयान्वये योजनेसाठी एकूण अर्थसंकल्पित निधीच्या फक्त 70 टक्केच म्हणजे 4.76 कोटी रूपये निधी उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यातून आतापर्यंत वितरीत झालेले 1.36 कोटी रूपये वगळता 3.40 कोटी रूपये निधी जिल्हा कृषी महोत्सवांना प्राप्त होणार आहे. सदरचा निधी राज्याच्या कृषी आयुक्तांना वितरीत करून त्याचा विनियोग करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांना कृषी महोत्सवांचे आयोजन करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

WhatsApp Group
Previous articleशुक्रवारी (12 जानेवारी) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळीचे भाव
Next articleदेशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर