Agriculture News : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत सन 2023/24 करीता महाराष्ट्र शासनाने सुमारे 441.63 कोटी रुपयांच्या निधी वितरणास आज मंगळवारी (ता.28) मंजुरी दिली. त्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला सुद्धा आहे. त्यात बाह्य हिश्श्याचा निधी 101.43 कोटी रूपये आणि राज्य हिश्श्याचा निधी 340.20 कोटी रूपये इतका आहे.
441 crores sanctioned for Nanaji Deshmukh Agricultural Sanjeevani Project
हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातील 4210 गावे तसेच पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पटट्यातील 932 गावांमध्ये सहा वर्षांच्या कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे 4000 कोटी रूपये अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. याशिवाय 17 फेब्रुवारी 2022 च्या शासन निर्णयान्वये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याच्या सर्व गावांचा या प्रकल्पात समावेश केलेला आहे. प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या गावांमध्ये विविध बाबींच्या अंमलबजावणीसाठी सन 2023/24 करीता सुमारे 766.324 कोटी रूपये निधी यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, तो खर्ची पडलेला आहे. त्यामुळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पावरील प्रलंबित दायित्व भागविण्याकरीता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांचेकडून 630.90 कोटी रूपये निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला होता. त्यानुसार सन 2023/24 च्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर तरतुदीतून शासनाने 441.63 कोटी रूपये निधी वितरणास मान्यता दिली आहे.