Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकरी खरिपात कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. मात्र, ओलिताची पुरेशी सोय उपलब्ध नसल्याने कापसाचे जवळपास 75 टक्के क्षेत्र हे कोरडवाहू स्वरूपाचे असते. हे लक्षात घेता कोरडवाहू शेतकऱ्यांना वरदान ठरू शकतील, असे तीन नवीन वाण परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाने संशोधित केल्या आहेत. विशेष म्हणजे नवीन वाण हे सरळ वाण प्रकारातील असून, ते दरवर्षी लागवडीसाठी पुन्हा वापरता येणार आहे.
These three new varieties of cotton will be a boon for dryland farming
नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रावर एन.एच. 1901, एन.एच. 1902 आणि एन.एच. 1904 या बीटीच्या सरळ वाणावर शास्त्रज्ञ सन 2015 पासून विविध प्रकारच्या चाचण्या घेत होते. संशोधनातील निष्कर्षानुसार तिन्ही वाणांची पावसाच्या भरवशावर केल्या जाणाऱ्या कोरडवाहू शेतीसाठी शिफारस करण्यात आली असून, रस शोषणाऱ्या कीडी तसेच हिरवी बोंडअळी, ठिपक्याची बोंडअळी यांना ते बळी पडणार नाही, असा दावा कापूस विशेषज्ञांनी केली आहे. त्यांच्यापासून मिळालेल्या कापसाच्या धाग्याची लांबी मध्यम स्वरूपाची असणार आहे. उल्लेखनीय म्हणजे कमी पाण्यावर हेक्टरी 16 ते 18 क्विंटल कापसाची उत्पादकता या वाणांपासून मिळू शकणार आहे.
कापसाची सरकी वेगळी करून पुढील वर्षी बियाणे म्हणून वापरता येईल
एकदा शेतात कापसाचे उत्पादन घेतल्यानंतर शेतकरी त्यातील सरकी वेगळी करून पुढील वर्षीच्या खरीप हंगामात ती बियाणे म्हणून वापरू शकणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कपाशीच्या बियाण्यावर जास्त खर्च प्रत्येकवर्षी करावा लागणार नाही. बोगस बियाणे खपवून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बाजारातील कंपन्यांनाही त्यामुळे आपोआप लगाम बसेल. नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रावर विकसित झालेल्या नवीन कापसाच्या वाणांची महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व गुजरात राज्यांसाठी शिफारस करण्यात आली आहे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)