हापूस आंब्यासाठी यंदा ‘या’ महिन्यापर्यंत पाहावी लागणार वाट

गावशिवार न्यूज | उत्तम चव आणि अप्रतिम गोडीसाठी प्रसिद्ध असलेल्या हापूस आंब्याचे कोकणातील रत्नागिरी व देवगड परिसरात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. हापूस आंबा बाजारात कधी दाखल होतो, याची ग्राहकांना दरवर्षी प्रतीक्षा असते. यंदा कोकणात थंडी थोडी उशिरा सुरू झाल्याने हापूसचे आगमन काहीअंशी लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या अखेर हापूस बाजारात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

For Alphonso Mango this year, we will have to wait till ‘this’ month

कोकण किनारपट्टीच्या भागात दिवसाचे कमाल तापमान व रात्रीचे किमान तापमान यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यभरात जेव्हा थंडीची लाट होती, तेव्हाही कोकणात उन्हाचे चटके जाणवत होते. आताही कोकणातील किमान तापमान हे 20 अंश सेल्सिअसच्या जवळपास असून, कमाल तापमान हे 34 अंशापर्यंत गेले आहे. वातावरणात अपेक्षित गारठा नसल्याचा परिणाम हापूस आंब्यावर जाणवत आहे. थंडीचे प्रमाण कमी असल्याने यंदा हापूस आंब्यांना पुरेशा प्रमाणात मोहोर आलेला नाही. त्यातही जेवढे आंबे फुटले आहेत, त्यांचा मोहोर वाचविण्यासाठी आंबा उत्पादकांना खूपच तारेवरची कसरत करावी लागत आहे. आतापर्यंत थंडी जेमतेमच होती. जानेवारी महिन्यात अपेक्षित थंडी न पडल्यास आंब्यांपासून मिळणाऱ्या फळ उत्पादनावर परिणाम होऊन बाजारात हापूसचे आगमन देखील त्यामुळे विलंबाने होण्याची शक्यता आहे. पुढील काळात थंडीत पुरेशी वाढ न झाल्यास मोहोराच्या कालावधीत फुटवे फुटण्याचा वेग देखील मंदावू शकतो. थंडी चांगल्या प्रकारे पडली तरच नवीन मोहोर हापूस आंब्याना येऊ शकणार आहे. अन्यथा आंब्याच्या उत्पादनात लक्षणीय घट येऊन बाजारात हापूसचे दर कडाडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

हापूस आंबा यंदाच्या हंगामात फेब्रुवारीपर्यंत बाजारात दाखल होणार

थंडीला अपेक्षित जोर नसल्याने कोकण किनारपट्टीच्या भागातील हापूस आंब्यांना यंदा पुरेसा मोहोर आलेला नाही. मात्र, समुद्र किनाऱ्यापासून दूर असलेला आंब्याच्या बागांना चांगली फूट आली आहे. पहिल्या टप्प्यातील मोहोरापासून साधारणतः फेब्रुवारी अखेरीस हापूसचे उत्पादन मिळण्याची चिन्हे असल्याचे आंबा बागायतदारांकडून सांगितले जात आहे. तोपर्यंत ग्राहकांनाही हापूसची वाट पाहावी लागणार आहे.

WhatsApp Group
Previous articleमंगळवारी (02 जानेवारी) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव
Next articleकांदा उत्पादक शेतकऱ्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले पत्र