भारत देश डाळ निर्मितीत चार वर्षात आत्मनिर्भर होईल : अमित शहांचा दावा

गावशिवार न्यूज | एकूण गरज लक्षात घेता भारत देश मूग आणि चणा डाळीच्या उत्पादनात आघाडीवर असून, दोन्ही डाळींचे मुबलक उत्पादन आपल्या देशात घेतले जाते. तुलनेत इतर डाळींच्या उत्पादनात आपण आज देखील पिछाडीवर असून, आयात केल्याशिवाय आपली गरज भागत नाही. मात्र, केंद्र सरकारकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नांमुळे भारत देश सन 2027 पर्यंत डाळ निर्मितीमध्ये आत्मनिर्भर होईल, असा दावा केंद्रिय सहकार मंत्री अमित शहा यांनी केला आहे. (Amit Shaha)

तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सुरु करण्यात आलेल्या नोंदणी, खरेदी आणि देयक वितरणाच्या पोर्टलचे उद्घाटन नवी दिल्लीत करण्यात आले. त्याप्रसंगी शेतकऱ्यांना संबोधित करताना केंद्रिय मंत्री अमित शहा बोलत होते. याप्रसंगी भारताला डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भर बनविण्यासाठी देशातील शेतकरी आवश्यक ते सर्व सहकार्य करतील, अशी आशा देखील केंद्रिय मंत्री शहा यांनी व्यक्त केली. दरम्यान, केंद्र सरकारने सुरु केलेल्या पोर्टलच्या माध्यमातूनच आता शेतकऱ्यांकडून तुरीच्या डाळीची खरेदी केली जाणार आहे. अर्थात, शेतकऱ्यांना त्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. जेणेकरून नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत डाळींची खरेदी आणि पैसे अदा केले जातील.

केंद्र सरकार आयात करणार 4 लाख टन तूर

दरम्यान, महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार सुमारे 4 लाख टन तूर आयात करण्याच्या विचारात आहे. कारण, देशांतर्गत यंदाच्या खरिपात तूर लागवडीखालील क्षेत्रात पर्यायाने उत्पादनात मोठी घट होण्याची चिन्हे आहेत. देशाची गरज लक्षात घेता तुरीचा साठा कायम राखण्यासाठी सरकारला मोठी तारेवरची कसरत त्यामुळे करावी लागणार आहे. दुसरीकडे बाजारात हरभऱ्याच्या दरात जवळपास 11 टक्के आणि मुगाच्या दरात 13 टक्क्यांनी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.

WhatsApp Group
Previous articleमुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत केळीचे दर पूर्ववत
Next articleशुक्रवारी (05 जानेवारी) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव