अचूक हवामान अंदाजासाठी आता कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर होणार

गावशिवार न्यूज | अवकाळी पाऊस, चक्री वादळे, गारपीट, महापूर, अतिथंडी आणि वाढत्या उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी पार मेटाकुटीला आले आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून सर्वांच्याच अपेक्षा वाढलेल्या असताना, अचूक हवामान अंदाजासाठी यापुढील काळात एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिली आहे. (Artificial Intelligence)

हवामान विभागाकडून नैसर्गिक आपत्तीची अचूक माहिती आधीच मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना आवश्यक ती तयारी करता येते. पीक कापणी किंवा मळणीची कामे लांबणीवर टाकता येतात किंवा काढणीवर आलेल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी पुरेशा उपाययोजना तातडीने करता येतात. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळले जाऊ शकते. प्रत्यक्षात आपल्याकडील हवामान विभागाकडून मिळालेली माहिती किंवा अंदाज बऱ्याचवेळा तंतोतंत खरा ठरत नसल्याने गेल्या काही वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना करोडोंचे नुकसान सोसावे लागले आहे. मोठ्या संख्येने पशुहानी तसेच जीवित हानी देखील झालेली आहे. शेतकऱ्यांना निसर्गाचा समतोल बिघडल्याने खुल्या वातावरणात शेती करणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळणे खूपच गरजेचे झाले आहे. एआय तंत्रज्ञानामुळे अचूक हवामान अंदाज मिळाल्याने भविष्यात पिकांची संभाव्य हानी टाळता येऊ शकेल, असा विश्वास देखील मृत्युंजय मोहपात्रा यांनी व्यक्त केला आहे.

असे काम करेल एआय तंत्रज्ञान
हवामान विभागाकडून हवामान घटकांचा अचूक अंदाज व्यक्त करण्यासाठी सध्याच्या घडीला सुमारे 150 वर्षांपासुनच्या जुन्या नोंदींचा वापर केला जात आहे. त्यापैकी 1901 सालापासुनच्या माहितीचे डिजिटायझेशन यापूर्वीच झाले आहे आणि त्याचाच वापर यापुढील काळात एआय तंत्रज्ञानासाठी वापरण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यात आली आहेत. सध्या ओडिशा आणि मध्य प्रदेशात वादळी वारे व मुसळधार पावसाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी चाचणी युनिट तयार केले जात आहे. त्यात यश आल्यानंतर एआय तंत्राचा हवामान अंदाजासाठी प्रत्यक्ष वापर करण्यास सुरूवात होऊ शकेल.

WhatsApp Group
Previous articleराज्यात थंडी परतली, किमान तापमान 5 ते 6 अंश सेल्सिअसने कमी झाले
Next articleशासन राज्यातील लहान शेतकऱ्यांसाठी ‘गाव तिथे गोदाम’ योजना राबविण्याच्या तयारीत