Assembly Winter Session : केंद्र सरकारने साखर हंगाम सुरू असतानाच यंदा उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास मनाई केली आहे. त्याचे पडसाद विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशात पडल्याशिवाय राहिले नाही. राज्य शासनाने इथेनॉल निर्मितीवरील बंदी व कांदा निर्यातीवरील बंदीबाबत आपली बाजू मांडावी, असा आग्रह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. यावेळी इथेनॉल बंदी, कांदा निर्यातबंदी हटविण्यासाठी केंद्रिय सहकार मंत्री अमित शहांची भेट घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
Deputy Chief Minister Ajit Pawar will meet Amit Shah to remove ethanol ban, onion export ban
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनीही इथेनॉल आणि कांदा प्रश्नावर शासनाला जाब विचारून त्यासंदर्भात निवेदन करण्याची मागणी केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य शासनाच्या बाजुने निवेदन केले. त्यांनी सांगितले, की महाराष्ट्र राज्यातील अनेक सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी पाच टक्के स्वभांडवल व 95 टक्के कर्जावर उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प उभारले आहेत. केंद्राने उसापासून इथेनॉल तयार करण्यास मनाई केल्याने संबंधित सर्व कारखाने कर्जाच्या खाईत जातील, याची कल्पना आपण केद्रिय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांना दिली आहे. त्यांनीही दोन दिवसात त्यासंदर्भात तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. गरज पडल्यास आपण स्वतः दिल्लीत जाऊन त्यांची भेट घेऊ, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षांना दिली. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात इथेनॉल निर्मितीवरील बंदी तसेच कांदा निर्यातबंदीचे पडसाद उमटल्यानंतर विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना शुक्रवारी चांगलेच धारेवर धरले होते.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)