Bamboo Farminig : राज्यातील बांबू लागवडीस प्रोत्साहन देऊन त्याचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी मुख्ममंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. त्यापुढे जाऊन बांबूच्या शेतीला चालना देण्यासाठी मुंबईत मंगळवारी (ता.09) पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
पर्यावरण रक्षणाला मोठा हातभार लावणाऱ्या आणि शेतकऱ्यांना कमी पाण्यावर शाश्वत कमाई देणाऱ्या बांबूच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाकडून आता ठोस उपाययोजना केल्या जात आहेत. रोजगार हमी योजनेतूनही शेतकऱ्यांना बांबू लागवडीकरीता सुमारे 7 लाखांचे अनुदान मिळत आहे. याशिवाय राज्य शासन बांबूचे औद्योगिक धोरण तयार करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करीत आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या कृती दलाच्या माध्यमातून त्यास गती देण्यात येणार आहे. शाश्वत भविष्यासाठी बांबूच्या क्षमतेचा वापर, हा शिखर परिषदेतील चर्चेचा मुख्य विषय असणार आहे. याशिवाय हवामान बदल आणि आव्हाने, बांबू आधारीत उपाययोजना, त्याची अंमलबजावणी व शाश्वत विकास या विषयांवर सदरच्या परिषदेत मंथन होणार आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित या परिषदेचे आयोजक केंद्रिय पर्यावरण मंत्रालय, महाराष्ट्र शासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ, लातुरचे फिनिक्स फाऊंडेशन हे आहेत. हवामान बदलामुळे झालेले पर्यावरणाचे नुकसान भरुन काढण्यासाठी बांबू पिकाचे महत्व वाढविण्याचे मोठे काम या शिखर परिषदेत केले जाणार आहे.
मुख्यंमत्र्यांच्या हस्ते शिखर परिषदेचे उद्घाटन
बांबूच्या शेतीला चालना देण्यासाठी मुंबईत मंगळवारी (ता.09) आयोजित पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते होणार आहे. या परिषदेला राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, गोदरेज उद्योग समुहाचे अध्यक्ष नादीर गोदरेज यांचीही उपस्थिती असणार आहे. एकूण पाच सत्रात या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, दुसऱ्या सत्राला उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच तिसऱ्या सत्राला केंद्रिय मंत्री नितीन गडकरी आणि चौथ्या सत्राला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील.