Banana News : जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी आधीच करपासह कुकुंबर मोझॅक व्हायरसने त्रस्त असताना, त्यात आता टीआर-1 आणि टीआर-2 (Fusarium Wilt of Banana) यासारख्या विषाणूजन्य रोगाचा धोका वाढला आहे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा आशयाचे निवेदन भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री.अमोल हरिभाऊ जावळे यांनी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
Alarm bells for banana growers…rapid spread of new viral disease
टीआर-1 आणि टीआर-2 (फ्युजारियम विल्ट) या विषाणूजन्य रोगाने एकदा पाय पसरल्यानंतर त्याचे असित्व सुमारे 30 वर्षांपर्यंत मातीत राहते आणि तो केळीची संपूर्ण बाग उद्धवस्त करू शकतो. प्राप्त माहितीनुसार केळीवर नव्याने आढळलेल्या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव सर्वात आधी चीनमध्ये दिसून आला होता. त्यानंतर त्याचा फैलाव लगतच्या नेपाळ देशात झाला. हळूहळू भारतातील बिहार, उत्तरप्रदेश, तमिळनाडू व गुजरात राज्यात त्याने प्रवेश केला. ज्या भागात या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला तेथील केळीच्या बागा पूर्णतः उध्दवस्त झाल्या असून, संबंधित शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. महाराष्ट्रातही फ्युजारियम विल्टसारख्या विषाणूजन्य रोगांचा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केळी लागवडीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यातही त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या भागातून येणाऱ्या मालवाहतूक गाड्यांची चाके तसेच मजुरांची पादत्राणे व साहित्य निर्जंतुकीकरण करण्याची गरज त्यासाठी निर्माण झाली आहे. यासर्व बाबींकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री.अमोल जावळे यांनी जळगावचे जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद यांचे लक्ष वेधले. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनीही प्रशासकीय पातळीवर तातडीने पुढील कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.
![](https://gavshivar.news/wp-content/uploads/2023/11/Untitled-370.jpg)
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)