बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाचे काम सुरू होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात

Barhanpur-Ankleshwar Highway : मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर ते गुजरात राज्यातील अंकलेश्वर शहर जोडणाऱ्या प्रस्तावित महामार्गाचे काम मंजूर झाले असून, शासन पातळीवर आवश्यक भूसंपादनाच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. दरम्यान, सदरचा महामार्ग जळगाव जिल्ह्यातील यावल तसेच सावदा, फैजपूर आणि रावेर शहरांना वळसा घालून जाणार असल्याने त्यास काही नागरिकांनी जोरदार विरोध केला आहे. केंद्रिय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनाही त्यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.

Barhanpur-Ankleshwar highway is in the midst of controversy even before the work starts

अंकलेश्वर- बऱ्हाणपूर महामार्ग चौपदरीकरणातून यावल, फैजपूर, सावदा व रावेर या शहरांना वगळलेले दिसून येते. रावेर शहर हा वर्षानुवर्षांपासून रावेर लोकसभा मतदार संघ तसेच रावेर विधानसभा मतदार संघ या नावाने ओळखला जातो. असे असून सुद्धा महामार्ग भूसंपादनासाठी रावेर व सावदा या शहरांना वगळून ग्रामीण क्षेत्रमार्गे चौपदरीकरण होत असलेला महामार्ग हा थेट मुक्ताईनगर तालुक्याला जोडला जात आहे. पूर्वीपासून अंकलेश्वर- बऱ्हाणपूर राज्यमार्ग क्रमांक-4 या नावाने वापरात आहे आणि तो फैजपुर-सावदा-रावेर ते चोरवड महाराष्ट्र राज्याची सीमा मार्गे बऱ्हाणपूरला जोडला जातो. त्यावरील परिवहन नाके आजपर्यंत अंमलात आहेत. यावल, रावेर, सावदा, फैजपुर परिसर व या शहरातील सर्व शेतकरी बांधव केळी उत्पादक, व्यापारी संपूर्ण देशाला केळीचा पुरवठा करतात. असे असताना यावल व रावेर तालुक्यांना दळणवळण व इतर व्यवसायांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. रावेर, सावदा-फैजपुर येथे ट्रक लोडींग, ट्रान्सपोर्टिंग केळी निर्यात करण्याचे कार्य सदैव सुरु असते. त्यानंतरही रावेर लोकसभा व विधानसभा मतदार संघातील बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर महामार्ग चौपदरीकरणाचे भूसंपादन वेगळ्या दिशेने होत असून हा सर्व शेतकरी बांधवांच्या सहनशिलतेचा अंत आहे. नव्याने चौपदीरकरण होत असलेला रस्ता हा यावल, रावेर व सावदा, फैजपुर या शहरातून किंवा शहराला लागून झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. ती मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. रावेरचे सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक श्रीराम पाटील यांच्यासह बऱ्याच नागरिकांनी हा लढा उभारला आहे.

यांनाही दिल्या आहेत निवेदनाच्या प्रती
जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, रावेरच्या खासदार रक्षा खडसे, जळगावचे खासदार उन्मेष पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रबंधक, जळगावचे पोलिस अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता यांनाही यावल, सावदा, फैजपूर व रावेर शहराबाहेरून जाणाऱ्या महामार्ग वळण रस्त्याचे भूसंपादन थांबविण्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

WhatsApp Group
Previous article500 कोटींच्या प्रशासकीय मान्यता देणारा जळगाव जिल्हा राज्यात प्रथम
Next articleराज्यातील किमान तापमानाचा पारा खालावला, सर्वत्र थंडीची चाहूल