मधमाशांमुळे परागीभवनाद्वारे पीक उत्पादनात 40 टक्क्यांपर्यंत होऊ शकते वाढ

गावशिवार न्यूज | परागीभवनाची प्रक्रिया होण्यासाठी राज्यात नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थिती पूरक आहे. मधमाशांद्वारे होणाऱ्या परागीभवनामुळे पिकांच्या उत्पादनात 5 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याची उदाहरणे आहेत. उत्पादनांची गुणवत्ता राखली जाऊन उत्पन्न अधिक पौष्टिक होत असल्याचेही संशोधनातून सिद्ध झाले आहे, अशी माहिती राहुरी कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सी. एस. पाटील यांनी दिली. (Beekeeping)

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित मध महोत्सवातील ‘शेती व मधमाशापालन’ या विषयावरील परिसंवादात डॉ. सी. एस. पाटील यांनी मार्गदर्शन केले. मधमाशांबद्दल जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे. किटकनाशकांचा पिकांवरील अतिरेकी वापर देखील मधमाशांसाठी घातक ठरत आहे. त्यामुळेच मधामध्ये कीडनाशकांचा अंश आढळून येत आहे, हे जास्त धोकादायक आहे. कीडनाशक मंडळाने 329 किडनाशके प्रमाणित केली आहेत, तीच शेतकऱ्यांनी वापरावीत. कीडनाशकांमुळे मधमाशा नष्ट होत आहेत. त्यांना वाचवायचे असेल, तर कीडनाशकांचा कमी वापर करून सेंद्रिय शेतीकडे वळावे असेही डॉ. पाटील म्हणाले. परिसंवादात सातारा जिल्ह्यातील बोरगाव येथील स्वाती गुरवे तसेच ठाणे जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र कोसवाड येथील उत्तम सहाणे सहभागी झाले होते. त्यांनीही मधमाशा पालनाविषयी मौलिक मार्गदर्शन केले.

आरोग्यासाठी खूपच गुणकारी आहे मध
विविध फळे, भाज्या, धान्य, तेलबिया आणि इतर पिकांमध्ये परागीभवनाची प्रक्रिया होते. निसर्गाचा जैविक समतोल साधण्याची किमया परागीभवनात असते. त्यात सर्वात जास्त हातभार हा मधमाशांचा लागतो तसेच पिकांना कीटकांपासून वाचविण्यातही मोठी मदत होत असते. मधमाशांमुळे परागीभवन झाल्यामुळे पीक उत्पादनात वाढ होते. तेलवर्गीय मोहरी पिकात 43 टक्के, सूर्यफुलात 32 ते 48 टक्के, करडईत 28 टक्के, तीळ 22 ते 37 टक्के, सोयाबीनमध्ये 19 टक्के, एरंडीमध्ये 30 टक्के, जवस 17 ते 40 टक्के, नायगरमध्ये 22 टक्के उत्पादन वाढ झाल्याचे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. मधमाशांमुळे मिळणारे मध हे सर्वात पौष्टिक अन्न मानले जाते. डोळ्यासाठी हितकारक, स्वरामध्ये सुधारणा, बुद्धीधारणक्षमता वाढविणारा म्हणून मधाची ओळख आहे. खोकला, पित्त, कफ, क्षय, कर्करोग, मधुमेह, ह्दयरोग, मळमळ यावर मध गुणकारी आहे. तसेच भूक वाढविण्यासाठीही तो उपयुक्त आहे. मधमाशांच्या संवर्धनासाठी आपण फुले देणाऱ्या झाडांची लागवड करण्याबरोबरच सेंद्रीय शेतीला प्राधान्य दिले पाहिजे. मधमाशांना आकर्षित करणाऱ्या पिकांची लागवड करून शेतात किमान एक तरी मधमाशी वसाहत असली पाहिजे. कीटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशकांचा कमीत कमी वापर केला पाहिजे. शेतात असलेल्या मधमाशींच्या पोळ्याचे संगोपन केले पाहिजे. तसेच प्रतिकूल हवामान असल्यास मधमाशी पेट्यांची काळजी घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन स्वाती गुरवे यांनी केले.

WhatsApp Group
Previous articleआवक वाढल्यानंतर कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी होऊ शकतो विचार
Next articleजळगावसह धुळे, नंदुरबार तसेच नाशिक जिल्ह्यात बऱ्यापैकी थंडी