पपई चवीला गोड असते तरी मनसोक्त खाऊ शकतात मधुमेही

गावशिवार न्यूज | रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यासाठी मधुमेही रूग्णांना बऱ्याचवेळा गोड फळे वर्ज्य केली जातात. त्यामुळे इच्छा असतानाही मधुमेहींना फळे खाताना जिभेवर ताबा ठेवावा लागतो. मात्र, पपई हे असे एकमेव फळ आहे जे चवीला गोड असले तरी ते खाल्ल्याने रक्तातील साखर वाढत नाही. उलट पपई खाणे मधुमेहींसाठी गुणकारी मानले जाते. (Benefits of papaya)

पपईमध्ये फायबर, जीवनसत्वे अ, ब, क, ई आणि कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडेंट हे घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे पपईचा आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. थकून घरी आल्यानंतर पपई खाल्ल्यास शरीराचा थकवा लागलीच कमी होतो. तसेच जीवनसत्व क शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राखते, असे आहार तज्ज्ञ सांगतात. याशिवाय पपई महिलांची अनियमित मासिक पाळी आणि मासिक पाळीच्या काळातील तक्रारी दूर करण्यासाठी उपयुक्त मानली जाते. विशेष म्हणजे पपईमध्ये वेदनाशामक गुणधर्म असल्याने सांधेदुखीच्या रूग्णांना पपईचे सेवन केल्यानंतर लागलीच आराम मिळू शकतो. पपईमधील जीवनसत्व क घटक कमकुवत झालेल्या सांध्यांना मजबुती देतो तसेच सांध्यांना आलेली सूज कमी करण्यास मदत करतो.

पपई वाढलेले वजन सुद्धा कमी करते
पपईच्या फळात अन्य फळांच्या तुलनेत कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी आणि फायबरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे वाढलेले वजन घटविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्यांना पपईच्या सेवनामुळे बराच फायदा होऊ शकतो. विशेष उल्लेखनीय म्हणजे पपईमध्ये जीवनसत्व क आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्याने रक्त वाहिन्यांमध्ये वाढलेले घातक कोलेस्टेरॉल कमी होण्यास हातभार लागतो. पर्यायाने हृदय विकाराचा धोका टाळला जातो. पपईमध्ये जीवनसत्व अ भरपूर प्रमाणात आढळते, त्यामुळे डोळे निरोगी राहतात. रिकाम्यापोटी पपईचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास देखील मदत होते, असेही तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे पपईचे सेवन करताना आपल्या आरोग्याला कोणता धोका तर नाही, असा विचार करू नका.

WhatsApp Group
Previous articleअबब…हापूस आंब्याच्या पेटीला मुहुर्तालाच 23 हजार रूपये दर
Next articleपुण्यात मालदांडी ज्वारीला 6600 रूपये प्रति क्विंटल मिळाला भाव