जळगाव ते मनमाड तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम 75 टक्के पूर्ण

Central Railway : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई मार्गावर जळगाव ते मनमाड दरम्यान सुरु असलेले तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम जवळपास 75 टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत सुमारे 999.36 कोटी रूपये निधी खर्च झाल्याची अधिकृत माहिती मध्य रेल्वेच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

The work of Jalgaon to Manmad third railway line is 75 percent complete

जळगाव ते भुसावळ दरम्यान तिसऱ्या व चौथ्या रेल्वे लाईनचे काम पूर्ण केल्यानंतर जळगाव ते मनमाड या 159.81 किलोमीटर अंतरातील तिसरा रेल्वेमार्ग अंथरण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी एकूण सुमारे 1035.16 कोटी रूपयांचा निधी यापूर्वीच मंजूर झालेला आहे. त्यामाध्यमातून आतापर्यंत 72.68 किलोमीटरचे मनमाड ते नांदगाव तसेच जळगाव ते पाचोरा दरम्यानचे तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. याशिवाय चाळीसगाव ते पिंपरखेड आणि चाळीसगाव ते पाचोरा दरम्यानच्या 55.34 किलोमीटर अंतरातील तिसऱ्या लाईनचे काम आता प्रगतीपथावर आहे. अशा प्रकारे साधारण 75 टक्के भौतिक काम जळगाव ते मनमाड दरम्यान आतापर्यंत झालेले आहे. या मार्गावरील तिसरी रेल्वे लाईन कार्यान्वित झाल्यानंतर मुंबईहून हावडा तसेच उत्तर भारताकडे धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचा खोळंबा कमी होऊ शकणार आहे.

अशी आहे जळगाव-मनमाड दरम्यानच्या तिसऱ्या लाईनच्या कामांची प्रगती
जळगाव ते मनमाड दरम्यानच्या तिसऱ्या रेल्वे लाईनसाठी फार जास्त भूसंपादन करावे लागलेले नाही. रेल्वेच्या हद्दीतच तिसरी लाईन अंथरली जात आहे. तरीही काही ठिकाणी मध्य रेल्वेला तिसऱ्या लाईनसाठी 16.45 हेक्टर जमिनीची आवश्यकता भासली आहे आणि त्यापैकी 11.39 हेक्टर जमिनीचे भूसंपादन देखील पूर्ण झाले आहे. जळगाव ते मनमाड दरम्यान अंथरल्या जाणाऱ्या रेल्वे लाईनसाठी एक मोठा पूल उभारला जात आहे, ज्याचे काम 40 टक्के पूर्ण झाले आहे. तसेच ठिकठिकाणी 21 मोठे पूल उभारले जाणार आहेत, त्यापैकी 11 पुलांचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय लहान पूल, उड्डाणपुलांची संख्या 295 इतकी राहणार असून, त्यापैकी 142 पुलांचे काम पूर्णत्वास आले आहे. 15 ठिकाणी नव्याने स्टेशन बिल्डिंगची कामे करावी लागणार आहेत, त्यापैकी 7 ठिकाणी नवीन बिल्डिंग उभ्या राहिल्या आहेत. ट्रॅक लिंकिंगची 160 किलोमीटरपैकी 70 किलोमीटरची कामे आटोपली आहेत. विद्युतीकरणाचे काम देखील आता प्रगतीपथावर आहे.

WhatsApp Group
Previous articleराज्यातील दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी केंद्राचे पथक पाहणी करणार
Next articleनिर्यातबंदीनंतर राज्यात कांद्याची आवक रोडावली, भावातही घसरण