गावशिवार न्यूज | भुसावळहून मुंबईकडे जाणाऱ्या वर्दळीच्या मार्गावर गुरुवारी (ता.4 जानेवारी) मध्य रेल्वेच्या प्रशासनाने पिंपरखेड ते न्यायडोंगरी स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक दुपारी 12.15 ते 4.35 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्याचा मोठा फटका भुसावळ ते मुंबई प्रवास करणाऱ्यांना बसणार आहे. (Central Railway Megablock)
जळगाव ते मनमाड दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. त्याचाच एक भाग म्हणून न्यायडोंगरी ते पिंपरखेड या स्थानकांदरम्यानच्या यार्डातील कामांसाठी गुरुवारी मध्य रेल्वेच्या प्रशासनाने मेगा ब्लॉक घेतला आहे. त्याकरीता नांदगाव, हिसवळ, पानेवाडी, मनमाड, पिंपरखेड आणि न्यायडोंगरी स्थानकांवर तब्बल 11 रेल्वेगाड्यांना ब्रेक देण्यात येणार आहे. दरम्यान, नाशिकहून जळगाव आणि भुसावळकडे येण्यासाठी सोयीची असणारी इगतपुरी ते भुसावळ ही मेमू गाडी सुद्धा गुरुवारी 2 तास विलंबाने सोडण्यात येणार आहे. त्यामुळे महत्वाच्या कामानिमित्त जळगाव, भुसावळहून नाशिक तसेच मुंबई जाणार असाल तर गुरुवारी थोडे थांबा किंवा पर्यायी वाहनांचा वापर करा. रेल्वेने प्रवासाला निघाल्यास तुमचा खोळंबा होऊ शकतो. याशिवाय धुक्यामुळे नांदेड ते अमृसर सचखंड एक्स्प्रेस तसेच जम्मुतवी-पुणे झेलम एक्स्प्रेस आणि गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेस एक ते चार तास उशिराने धावत आहेत. त्यामुळेही प्रवाशांना ताटकळावे लागू शकते.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)