Cheating of cotton farmers : वऱ्हाडातील भालेगाव (ता.मलकापूर) येथील मूळ रहिवासी असलेल्या जगन नारखेडे उर्फ जग्गू डॉनने शेकडो कापूस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करून पाच ते सहा कोटींची मालमत्ता खरेदी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे जग्गू डॉनने जळगाव जिल्ह्यातील बोदवडच्या एका जिनिंगची खरेदी करण्यासाठी सुमारे दोन कोटी रूपयांची सौदा पावती केल्याचेही आढळले आहे.
संशयित आरोपी जगन नारखेडे हा शेतकऱ्यांकडून जादा भाव देऊन कापसाची खरेदी करीत असे. बाजारात कापसाला कोणी सात-आठ हजार रूपये क्विंटलचा भाव देत असेल तर जगन शेतकऱ्यांना सुमारे 9 हजार रूपये प्रतिक्विंटलचा भाव द्यायचा. त्यामुळे परिसरातील शेतकरी त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू लागले होते. त्याचाच गैरफायदा घेऊन जगन उर्फ जग्गू डॉन हा कोट्यवधी रूपयांचा कापूस उधार खरेदी करून नंतर फरार झाला. शेतकऱ्यांना फसवून जगन नारखेडे याने आजपर्यंत सुमारे 5.76 कोटी रूपयांची मालमत्ता खरेदी केली आहे. मलकापूर येथील पोलिसांनी त्याची काही मालमत्ता जप्त देखील केली आहे. संशयित जगन याने पत्नी जयश्री नारखेडे हिच्या नावावर सुद्धा मलकापूर येथे 2 गाळे, फ्लॅट तसेच सुमारे 31 लाख रूपयांची कार, भालेगाव येथे 70 लाखांची शेती खरेदी केल्याचे उघड झाले आहे. तसेच त्याला कापूस खरेदी करण्यास मदत करणाऱ्या दलालांना त्याने 20 ते 25 कोटी रूपये दिले आहेत, जे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. कापूस उत्पादकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या संशयित जगन नारखेडे याच्या विरोधात मलकापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या काही साथीदारांनाही अटक झाली आहे.
पठ्ठ्याने नोटा छापण्याचे मशिनच खरेदी करून ठेवले होते
कापूस उत्पादकांना फसविण्याचे काम करीत असतानाच, संशयित जगन नारखेडे याने नकली नोटा छापण्याच्या उद्देशाने सुमारे 20 लाख रूपयांच्या मशिन खरेदी करून ठेवल्या होत्या. त्या पोलिसांनी आता जप्त केल्या आहेत. त्याद्वारे नकली नोटा छापण्याचा खरच त्याचा उद्देश होता की काय, त्याची शहनिशा मलकापूर पोलिस करीत आहेत. त्यासाठी न्याय सहाय्यक प्रयोगशाळा व नाशिक येथील सिक्युरिटी प्रेसचे मार्गदर्शन घेतले जात आहे. दरम्यान, आरोपीला मध्यप्रदेशातून अटक करण्यात आली आहे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)