गावशिवार न्यूज | खान्देशात नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी लाल मिरचीचे उत्पादन दरवर्षी मोठ्या प्रमाणात घेतात. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगले उत्पादन हाती आल्याने, बाजारात मिरचीची आवक बऱ्यापैकी वाढली आहे. बाजारभाव देखील गेल्या वर्षीपेक्षा थोडे कमीच आहेत. सद्यःस्थितीत विशेषतः ओल्या लाल मिरचीला नंदुरबारमध्ये सरासरी 2500 ते 3200 रूपये प्रति क्विंटलचा भाव आहे. (Chili Market)
नंदुरबार जिल्ह्यात उत्पादित झालेल्या बारीक ओल्या लाल मिरचीला मागील वर्षीच्या हंगामात 5000 ते 5500, सरासरी 5200 रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला होता. त्यामानाने यंदा बारीक ओल्या लाल मिरचीला 3500 ते 4000, सरासरी 3200 रूपये प्रति क्विंटलप्रमाणे भाव मिळाला आहे. याशिवाय नंदुरबारमध्ये गेल्या वर्षी मोठ्या जाड मिरचीला 6000 ते 6500 रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला होता, त्यामानाने यंदा मोठ्या आकाराच्या मिरचीला 2700 ते 3000, सरासरी 2500 रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला आहे. नंदुरबारमध्ये स्थानिक तसेच नजिकच्या शहादा तालुक्यातून आणि गुजरात राज्यातील निझर भागातून विशेषकरून ओल्या लाल मिरचीची आवक होत असते. महिनाभरापासून ओल्या लाल मिरचीची दैनंदिन सरासरी 1000 क्विंटलपर्यंत आवक होत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत आवक बरीच जास्त असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित असणारे दर त्यामुळे मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
हिरव्या मिरचीला दर नसल्याने शेतकरी लाल मिरचीकडे वळले
नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी मिरचीचे उत्पादन घेत असताना, शक्यतो हिरव्या मिरचीच्या विक्रीतून पैसा कमावण्यावर भर देत असतात. मात्र, यंदाच्या हंगामात उत्पादन वाढल्याने हिरव्या मिरचीला अपेक्षित भाव मिळू शकलेला नाही. त्यामुळे संबंधित सर्व शेतकऱ्यांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन हिरवी मिरची तोडण्यापेक्षा तिला झाडावरच लाल होऊ दिले आहे. परिणामी, बाजारात साधारणपणे डिसेंबरपासून ओल्या लाल मिरचीची आवक वाढली असून, मागणीपेक्षा जास्त आवक झाल्यानंतर मिरचीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)