CMO Maharashtra : राज्यातील उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भ तसेच कोकण, मराठवाड्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यांसह गारपीट व अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी तसेच कांदा, भाजीपाला व फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. संबंधित सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय यंत्रणेला तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
The Chief Minister Eknath Shinde ordered a crop panchnama to provide relief to the loss-affected farmers
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, बुलडाणा, हिंगोली, जालना, परभणीस नांदेड या जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी गारपीट झाल्याने उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत. पैकी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालु्क्यात शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेल्या द्राक्षांच्या बागा गारपिटीमुळे उद्ध्वस्त झाल्या असून, संबंधित शेतकऱ्यांमध्ये नुकसान सोसण्याचे त्राणच आता शिल्लक राहिलेले नाही. खान्देशातही वेचणीवर आलेला कापूस पावसात भिजला आहे. काढणीवर आलेला कांदा पावसात सापडला आहे. विदर्भातही तूर तसेच ज्वारीचे नुकसान झाले आहे. ही स्थिती लक्षात घेता आधीच दुष्काळामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्याकरीता शासनस्तरावर तातडीने पंचनामे करणे क्रमप्राप्त ठरले आहे. त्याच उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी व महसूल विभागाच्या यंत्रणेला अवकाळी पाऊस तसेच वादळी वारा व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शासन यंत्रणा त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणार आहे. नुकसान पातळीनुसार संबंधित शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई मिळण्याची आशा पल्लवित त्यामुळे झाली आहे.