आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीच्या बैठकीत ‘या’ विषयांवर मंथन

Cotton Advisory Committee Meeting : मुंबईच्या जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सध्या आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीची चार दिवसीय महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याठिकाणी देश-विदेशातून उपस्थित राहिलेल्या सुमारे 400 प्रतिनिधींकडून कापसाची उत्पादकता, गुणवत्ता, हवामानातील बदल, तंत्रज्ञान, ब्रँडिंग तसेच इतर काही समस्यांवर विचारमंथन केले जात आहे. देशाचे केंद्रिय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी त्या बैठकीचे शनिवारी (ता.2) उद्घाटन केले.

Meeting of the International Cotton Advisory Committee

जगातील कपाशी लागवडीखालील क्षेत्रापैकी सर्वाधिक कपाशी लागवड ही भारत देशात होत असते. मात्र, उत्पादनाच्या बाबतीत भारत देश खूपच पिछाडीवर आहे. जगभरातील प्रमुख कापूस उत्पादक देशांशी स्पर्धा करताना भारताला उच्च आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून कापसाची उत्पादकता वाढवावी लागेल, असे प्रतिपादन वाणिज्य मंत्री श्री. गोयल यांनी आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीच्या उद्घाटन प्रसंगी केले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रिय वस्त्रोद्योग विभागाच्या सचिव रचना शहा, वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी, समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅकनबर्ग यांच्यासह सुमारे 33 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आधुनिक तंत्रज्ञानासह बदलते हवामान, उत्पादनातील नवीन कल्पना, गुणवत्तेची हमी व अन्य काही समस्यांवर आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीच्या बैठकीत उपस्थित सर्व देशांचे प्रतिनिधी त्यांचे कापूस पिकाचे अनुभव तसेच त्यांच्याकडील पीक पद्धतीविषयी सादरीकरण करतील. यानिमित्ताने कापूस उत्पादक आणि कापसाच्या व्यापाऱ्यातील अग्रगण्य देशांना एकत्र येऊन चर्चा करण्याची मोठी संधी मिळाली आहे, असेही मंत्री श्री.गोयल यांनी स्पष्ट केले.

या देशांच्या प्रतिनिधींचा बैठकीत आहे समावेश

आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीच्या चार दिवसीय बैठकीत कापूस उत्पादक शेतकरी, शास्त्रज्ञ, तज्ज्ञ, व्यापारी, उद्योगपती सहभागी होणार आहेत. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, ब्राझील, बोलिव्हिया, कॅमेरून, इजिप्त, फ्रान्स, जर्मनी, इटली, पोलंड, नेदरलँड, मलाया, मोझँबिक, नायजेरिया, जपान, पाकिस्तान, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, सुदान, इन्हान, टांझानिया, तुर्की, युनायटेड किंगडम, यूएसए, झांबिया, उझबेकिस्तान, स्वित्झर्लंड अशा देशांच्या प्रतिनिधींचा त्यात समावेश आहे.

WhatsApp Group
Previous articleहुश्श…अखेर राज्यात अवकाळी पावसाचा जोर कमी झाला
Next articleअवकाळी पावसामुळे राज्यातील रब्बीच्या पेरण्यांना लागला ब्रेक