Cotton Market: चालू हंगामात देशातील कापूस उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज भारतीय कापूस संघटनेने (CAI) वर्तविला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार देशात यंदा फक्त 295 लाख कापूस गाठींचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. कमी पर्जन्यमान आणि प्रतिकूल हवामान यामुळे यंदा कापसाचे उत्पादन हे गेल्या 15 वर्षांतील निच्चांकी पातळीवर राहील, असेही कापूस संघटनेने म्हटले आहे. दरम्यान, देशांतर्गत अपेक्षित असणारे उत्पादन घटल्याने कापसाचे भाव यंदा तेजीत राहण्याची शक्यता बळावली आहे.
देशात संरक्षित पाणीसाठ्याची सोय असणारे शेतकरी पूर्वहंगामी कापसाची लागवड साधारपण एप्रिल-मे दरम्यान करतात. तर कोरडवाहू पावसाच्या भरवशावरील शेतकरी साधारण 15 जूननंतर त्यांच्या शेतात कपाशीची लागवड करताना दिसून येतात. कमी-अधिक फरकाने सप्टेंबरपासून कापसाच्या प्रत्यक्ष उत्पादनाला सुरूवात होते. ऑक्टोबरनंतर कापसाच्या वेचणीला जास्त वेग येतो. दुर्दैवाने यंदा सुरूवातीपासूनच पावसाळा कमजोर राहिल्याने पूर्वहंगामी व कोरडवाहू शेतीत लागवड झालेल्या कापसाची अपेक्षित वाढ झालीच नाही. तोकड्या पाण्यावर जेवढे काही पीक शेतात तग धरून उभे राहिले, त्यास रस शोषणारी कीड तसेच बोंडअळीचा विळखा पडला. लाल्याची विकृती तसेच आकस्मिक मर रोगाने कपाशीचे बरेच नुकसान केले. अशा परिस्थितीत देशातील एकूण कापूस उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम झाल्याचे निरीक्षण भारतीय कापूस संघटनेने नोंदवले आहे. देशातील कापूस उत्पादन हे 2022/23 च्या खरीप हंगामात 318 लाख गाठी (एक गाठ 170 किलो रूई) इतके होते. यंदा गेल्या वर्षींच्या तुलनेत कापसाच्या उत्पादनात बरीच म्हणजे जवळपास 20 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज वर्तविला जातो आहे. सन 2008/09 नंतर पहिल्यांदा भारतात कापसाचे उत्पादन घटण्याची चिन्हे दिसून आली असून, त्याचा कापसाच्या व्यापारावर लक्षणीय परिणाम होणार आहे. प्राप्त माहितीनुसार यंदा कमी पर्जन्यमानामुळे देशातील कापूस लागवडीखालील क्षेत्र आधीच 5.5 टक्के घटले आहे. त्यात एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल हवामानाने कापसाच्या उत्पादनात मोठी घट अपेक्षित आहे.
कापसाची आयात वाढण्याची शक्यता
भारतीय कापूस संघटनेने यंदाच्या खरीप हंगामात देशांतर्गत कापूस उत्पादक राज्यांमधील उत्पादनाचा अंदाजही व्यक्त केला आहे. त्यानुसार गुजरातमध्ये 85 लाख कापूस गाठी, खालोखाल महाराष्ट्रात 76 लाख कापूस गाठी, तेलंगण राज्यात 30 लाख कापूस गाठी, कर्नाटकात 18.5 लाख कापूस गाठी, मध्य प्रदेशात 18 लाख कापूस गाठी आणि हरियाणामध्ये 16 लाख कापूस गाठींचे उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. देशात ऑक्टोबरच्या सुरूवातीला 2.89 दशलक्ष गाठींचा ओपनिंग स्टॉक नोंदविण्यात आला आहे. चालू हंगामात कापसाची आयात 2.2 दशलक्ष गाठी आणि निर्यात 1.4 दशलक्ष गाठी राहण्याचा अंदाज आहे. 2023-24 च्या हंगामासाठी देशांतर्गत मागणी 31.1 दशलक्ष गाठी एवढी आहे आणि सरप्लस सुमारे 3.5 दशलक्ष गाठी असेल, असेही भारतीय कापूस संघटनेने म्हटले आहे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)