भाववाढीच्या आशेने घरात कापूस भरून ठेवणारे शेतकरी व्यापाऱ्यांनी पकडले कोंडीत

Cotton Market Update : विविध कारणांनी उत्पादन खर्च वाढल्यानंतर कापसाला किमान 10 हजार रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळण्याची आशा राज्यातील शेतकरी आता बाळगू लागले आहेत. मात्र, खुल्या बाजारात मूल्य घटल्याने कापसाला कोणीच 7 हजार रूपये क्विंटलपेक्षा जास्त भाव देत नसल्याचे दिसून आले आहे. त्यातही भाववाढीच्या आशेने घरात गेल्या वर्षीचा कापूस भरून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी चांगलेच कोंडीत पकडले आहे.

Farmers who kept cotton in their houses in the hope of price increase were caught in a dilemma by the traders

गेल्या वर्षीच्या हंगामात सुरूवातीला कापसाचे भाव सुमारे 12 हजार रूपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले होते. परंतु, शेतकऱ्यांनी चांगल्या भावाच्या आशेने त्यांच्याकडील कापूस विकला नाही. त्यानंतर जसजशी कापसाची आवक वाढत गेली, कापसाचे भाव खाली येत गेले. 9100 रूपये प्रतिक्विंटलपर्यंत कापसाचे भाव खाली आल्यानंतरही शेतकऱ्यांनी भाववाढीची आशा सोडली नाही. परिणामी खेडा खरेदीच्या माध्यमातून खुल्या बाजारात कापसाची खरेदी करण्यासाठी फिरणाऱ्या व्यापाऱ्यांना कापूस मिळणे मुश्किल झाले. जोपर्यंत चांगला भाव मिळत नाही तोपर्यंत घरातील कापूस न विकण्यावर शेतकरी ठाम राहिले. दुर्दैवाने नंतरच्या कालावधीत कापसाचे भाव आणखी तुटले. काही शेतकरी त्यामुळे मोठे नुकसान सोसून 7200 रूपये प्रतिक्विंटलच्या भावाने घरात साठविलेला कापूस विकून मोकळे झाले. तर काही शेतकरी यंदा नाही तर पुढील वर्षी तरी कापसाला चांगला भाव मिळेल, या भोळ्या आशेवर अडचण असतानाही थांबून राहिले. संबंधित सर्व शेतकऱ्यांना व्यापारी आता 5500 रूपये प्रतिक्विंटलच्या भावाने जुना कापूस मागत आहेत. त्यात इतके दिवस घरात साठविलेल्या कापसाचे वजन देखील आता मोठ्या प्रमाणात घटले आहे. म्हणजे भाववाढीच्या आशेने कापूस न विकणाऱ्या शेतकऱ्यांना क्विंटलमागे किमान 4 हजार रूपयांचा आर्थिक फटका बसला आहे.

पावसात भिजलेल्या कापसालाही कवडीमोल भाव
यंदाच्या खरिपात जेवढ्या काही शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली होती, त्यांचा कापूस अवकाळी पावसात सापडल्याने मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. त्यात बोंडअळीमुळे चांगल्या बोंडांची वाट लागलेली आहे. अशा या विपरित परिस्थितीत कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली असून, बहुतांश शेतकऱ्यांना प्रतिएकरी जेमतेम 3 ते 4 क्विंटल कापसाचे उत्पादन मिळाले आहे. त्यात व्यापारी या कापसाला 6500 रूपये प्रतिक्विंटलपेक्षा जास्त भाव देण्यास तयार नसल्याचे निदर्शनास आले आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांची त्यामुळे मोठी कोंडी झाली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ठिकठिकाणी पणन महासंघ तसेच सीसीआयच्या माध्यमातून कापूस खरेदी केंद्रे तातडीने सुरु करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

WhatsApp Group
Previous articleकापसाला ‘कोणत्या’ राज्यात मिळाला सर्वाधिक 9100 रूपये प्रतिक्विंटल भाव ?
Next articleदक्षिण भारतातील ‘या’ दोन राज्यांमध्ये तुफान पाऊस, शाळांना सुटी जाहीर