कोरडवाहू शेतीसाठी उपयुक्त ठरणारे मेडिकेटेड कापूस वाण विकसित

गावशिवार न्यूज | नागपूर येथील केंद्रिय कापूस संशोधन संस्थेला कोरडवाहू तसेच हलक्या जमिनीसाठी उपयुक्त असलेले मेडिकेटेड म्हणजेच वैद्यकीय क्षेत्रासाठी वापरात येणारे कापसाचे नवीन वाण विकसित करण्यात मोठे यश मिळाले आहे. विशेष म्हणजे अतिसघन पद्धतीने लागवड केल्यास या वाणापासून हेक्टरी सुमारे 20 क्विंटलपर्यंत उत्पादकता मिळू शकते. पिकाचा कालावधी 120 ते 140 दिवस असणार आहे. (Cotton Research)

वैद्यकीय क्षेत्रात दररोज वैशिष्ट्यपूर्ण अशा मेडिकेटेड कापसाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे मेडिकेटेड कापसाला चांगला भाव देखिल मिळतो. शेतातून वेचून आणणेल्या कापसावर प्रथम प्रक्रिया केली जाते. त्यानंतर तो दवाखाने आणि मेडिकल्सवर दाखल होतो. पांढऱ्या शुभ्र असलेल्या या किंमती कापसाची वाढती मागणी लक्षात घेऊनच नागपुरच्या केंद्रिय कापूस संशोधन संस्थेने नवीन वाण विकसित केले आहे. वैद्यकीय क्षेत्रासाठी वापरल्या जाणाऱ्या कापडाची निर्मिती करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या कापसाच्या या वाणात मायक्रोनिअर 3.5 ते 4.5 इतके असते. विशेष म्हणजे या वाणाचा कलर ग्रेड 74 ते 75 इतका आहे. त्यामुळे तो अतिशय पांढरा शुभ्र दिसतो. त्याच्या धाग्याची लांबी देखील 23 आहे. सर्वात खास बाब म्हणजे या वाणापासून मिळालेल्या कापसाची पाणी शोषण क्षमता इतर वाणांच्या तुलनेत 25 टक्के अधिक आहे. वर्षभर मागणी असणाऱ्या या कापसाचे उत्पादन घेतल्यास कोरडवाहू शेतकऱ्यांना नक्कीच चांगले दिवस येतील. नागपुरच्या कापूस संशोधन संस्थेकडून कापसाच्या या वाणाचे बियाणे शेतकऱ्यांनाही उपलब्ध केले जाणार आहे.

WhatsApp Group
Previous articleउत्तर महाराष्ट्राचे तापमान घसरले, नाशिक व जळगाव जिल्हे गारठले
Next articleमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘ब्रेक’ के बाद केळीचे भाव पुन्हा तेजीत