Cotton Textile Park : कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्यातील वस्त्रोद्योगास चालना देण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून काही वर्षांपासून सुरू आहे. त्याअंतर्गतच विदर्भातील अकोला येथे आणखी एक टेक्सटाईल पार्क उभारण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. विदर्भात याआधीच अमरावती येथे पंतप्रधान मित्र महावस्त्रोद्योग उद्यान योजनेंतर्गत टेस्टटाईल पार्क मंजूर झालेला आहे.
Another textile park will be set up in ‘this’ district of Vidarbha
राज्यातील कपाशी लागवडीखालील एकूण क्षेत्र लक्षात घेता उत्पादित झालेल्या कच्च्या कापसावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची संख्या तशी कमीच आहे. त्यातही जेवढे काही प्रक्रिया उद्योग सध्या राज्यात कार्यरत आहेत त्यांच्याकडून जिनिंग आणि प्रेसिंग या पलिकडे कोणतीच प्रक्रिया कापसावर केली जात नाही. परिणामी, राज्यातील कापूस उत्पादकांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत फार चांगले भाव खुल्या बाजारात मिळत नाही. ही स्थिती लक्षात घेता वस्त्रोद्योग धोरणाला चालना देतानाच राज्यात ठिकठिकाणी टेक्सटाईल्स पार्क उभारण्यावर भर दिला जात आहे. त्यामाध्यमातून जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे यापूर्वीच टेक्सटाईल पार्कला मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या पंतप्रधान मित्र महा वस्त्रोद्योग उद्यान योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात 10 हजार कोटींच्या गुंतवणुकीसह 3 लाख रोजगार निर्मितीची अपेक्षा असलेला टेक्सटाईल पार्क मंजूर झाला आहे. त्यानंतर आता अकोल्यात टेक्सटाईल पार्कला मंजुरी मिळाली आहे.
100 हेक्टर क्षेत्र टेक्सटाईल पार्कसाठी राखीव
पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांचा विकास व्हावा तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगाराचे साधन मिळावे, यासाठी अकोला येथे टेक्सटाईल उभारण्याची घोषणा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत केली आहे. विधानपरिषदेचे सदस्य अमोल मिटकरी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सामंत यांनी अकोल्यातील प्रस्तावित टेक्सटाईल पार्कची माहिती दिली. अकोल्यात औद्योगिक वसाहतीचा विकास करण्यासाठी संपादित केलेल्या 661.43 हेक्टर जागेपैकी सुमारे 100 हेक्टर क्षेत्र टेक्सटाईल पार्कसाठी राखीव ठेवले आहे. त्यातील 43.83 हेक्टरवरील 50 आरेखित भूखंड वाटपास उपलब्ध असल्याचेही मंत्री श्री.सामंत यांनी स्पष्ट केले.