Cow Milk Rate : गायीच्या दुधाला 30 रूपये प्रतिलिटर दर, शासनाचे परिपत्रक केराच्या टोपलीत

Cow Milk Rate : राज्य शासनाने परिपत्रक जारी करून सहकारी व खासगी दूध संघांना गायीच्या दुधाला प्रतिलिटर किमान 34 रूपये खरेदी दर देण्याचे 21 जुलै 2023 पासून बंधनकारक केले होते. प्रत्यक्षात शासनाच्या त्या परिपत्रकाला बहुतांश सर्व दूध संघांनी आता केराच्या टोपलीत टाकले आहे. जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच ‘विकास’ने देखील मंगळवार (ता. 21) पासून गायीच्या 3.5/8.5 दुधाचे खरेदीदर 30.60 रू. प्रतिलिटर केले आहेत.

Rs 30 per liter rate for cow’s milk, Govt circular ineffective

राज्यातील दूध उत्पादकांना वाढत्या उत्पादनखर्चाच्या तुलनेत खरेदी दर मिळवून देण्याच्या उद्देशाने चार महिन्यांपूर्वी शासन निर्णय जारी करण्यात आला होता. दूध खरेदी दराच्या निश्चितीसाठी दुग्ध व्यवसाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती सुद्धा नेमण्यात आली होती. या समितीने 3.5 फॅट आणि 8.5 टक्के एसएनएफ दर्जाच्या दुधाला किमान 34 रूपये निश्चित दर देण्याकरीता केलेली शिफारस राज्य शासनाने मान्य देखील केली होती. तसेच दूध दराची अंमलबजावणी होते आहे किंवा नाही, याबाबतचा अहवाल जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकाऱ्यांना सादर करण्याच्या सूचना देण्यात दिल्या होत्या. दरम्यान, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा आढावा घेऊन समितीने दर तीन महिन्यांनी किमान दूध खरेदी दराची शिफारस राज्य सरकारला करावयाची होती. विशिष्ट अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास तीन महिन्यांपूर्वीही समितीने दूध दराबाबत शासनाला शिफारस करणे गरजेचे आहे, असेही शासन आदेशात म्हटले होते. दुर्दैवाने शासनाचा गायीच्या दूध खरेदीबाबतचा निर्णय राज्यात चार महिन्यातच बासनात गुंडाळला गेला आहे. दुग्ध व्यवसाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली सहा सदस्यीय समिती आता फक्त नावालाच उरली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दुधाच्या भुकटीचे दर पडल्याचे कारण देऊन एकापाठोपाठ एक अनेक खासगी व सहकारी दूध संघांनी विशेषतः गायीच्या दुधाचे खरेदीदर पाडण्यास सुरुवात केली आहे.

म्हशीचे दूध जैसे थे, गायीचे दूध कवडीमोल

दरम्यान, राज्यातील खासगी व सहकारी दूध संघांमध्ये गायीच्या दुधाचे खरेदीचे दर पाडण्यासाठी छुपी स्पर्धा सुरु झालेली असताना, म्हशीच्या दुधाचे खरेदी दरात कोणतीच कपात करण्यात आलेली नाही. तुलनेत गायीच्या दुधाचे खरेदी दर हळूहळू खाली आणण्याचा प्रयत्न सहकारी व खासगी संघांकडून केला जातो आहे. त्यामुळे चार-पाच महिन्यांपूर्वी 35 ते 36 रूपये दराने खरेदी केले जाणारे गायीचे 3.5 फॅट व 8.5 टक्के एसएनएफ दर्जाचे दूध आता 30 रूपये प्रतिलिटरपर्यंत खाली आले आहे. आणखी काही दिवस राज्य शासनाने नियुक्त केलेल्या दुग्ध व्यवसाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय समितीने हालचाल न केल्यास कदाचित गायीचे दूध 25 रूपये लिटरच्या भावाने खरेदी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

WhatsApp Group
Previous articleBanana Rate : उद्या बुधवारी (ता. 22 नोव्हेंबर) असे असतील केळीचे भाव
Next articleBanana Rate : केळीला गुजरातच्या सुरत बाजार समितीत मिळतोय सध्या असा भाव