Crop Damage : राज्यात अवकाळी पाऊस तसेच वादळी वारे व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. संबंधित सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी तातडीने एकरी 25 हजार रूपये भरपाई शासनाने द्यावी, अशी मागणी विधानसभेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
25,000 per acre compensation to distressed farmers, the opposition demands
शासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून हिवाळी अधिवेशनाची वाट न पाहता अवकाळी पावसाची नुकसान भरपाई तसेच आधी घोषीत केलेल्या दुष्काळी तालुक्यांना मदत जाहीर करण्यासाठी पावले उचलावी, असेही श्री.वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापडलेला असताना केवळ थापांचे धूर सोडू नका. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत जाहीर करा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सरकारकडे केली आहे.
मंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही
राज्यात अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे रब्बी पिकांसह खरिपातील कापूस, कांदा, मका पिकांचे तसेच द्राक्ष, मोसंबी, केळी, चिकू, पेरूच्या फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील तसेच शक्य ती मदत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.