राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांसाठी ‘इतक्या’ कोटी रूपयांची अग्रीम पीकविमा रक्कम मंजूर

Crop Insurance : अनियमित पाऊस तसेच गारपीट, वादळी वारे यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी राज्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून मोठी रक्कम मंजूर झाली आहे. सदरच्या 25 टक्के अग्रीम पीकविमा रकमेचे वितरण सोमवार (ता.11) पासून सुरू देखील झाले आहे, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दिली.

Advance crop insurance amount approved for 52 lakh farmers in the state

राज्यातील 24 जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना देण्यासाठी संबंधित सर्व पीकविमा कंपन्यांना 25 टक्के अग्रीम पीकविमा हप्ता वितरीत करण्याचे आदेश ठिकठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले होते. याशिवाय शासनस्तरावरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रीम पीकविमा रक्कम मिळेल, असा दावा केला जात होता. प्रत्यक्षात संबंधित शेतकऱ्यांना तशी कोणतीच विमा रक्कम मिळू शकलेली नव्हती. दरम्यान, काही पीकविमा कंपन्या अपिलात गेल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम विमा रक्कम मिळते किंवा नाही त्याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. सुदैवाने पीकविमा कंपन्यांचे अपील फेटाळण्यात आल्याने शेतकऱ्यांना अग्रीम पीकविमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यासंदर्भात विरोधी पक्षांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्नही उपस्थित केला होता.

सुमारे 2216 कोटी रूपये अग्रीम पीकविमा रकमेचे वितरण
नैसर्गिक आपत्तीमुळे हतबल झालेल्या राज्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 2,216 कोटी रूपयांची 25 टक्के अग्रीम पीकविमा रक्कम मंजूर झाली आहे. सोमवार (ता.11) अखेर मंजूर पीकविमा रकमेपैकी 1690 कोटी रूपयांच्या निधीचे वितरण झाले आहे. उर्वरित सुमारे 634 कोटी रूपये निधीचे वितरण देखील वेगाने सुरू असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधीमंडळात विरोधी पक्षांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.

WhatsApp Group
Previous articleउद्या मंगळवारी (ता.12 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव
Next articleजळगावच्या जैन हिल्सवरील कृषी महोत्सवाला मॉरिशसच्या शेतकऱ्यांची भेट