जळगावचे केळी उत्पादक पीकविम्यासाठी आता उच्च न्यायालयाचे दार ठोठावणार

गावशिवार न्यूज | पीकविमा कंपनीच्या आडमुड्या धोरणांमुळे जिल्ह्यातील सुमारे 21 हजार केळी उत्पादक शेतकरी अद्याप नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. संबंधितांनी विमा कंपनीचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन देखील केले, तरीही कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे केळी उत्पादकांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. (Crop Insurance)

जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवून पीकविमा कंपनी आता कोणत्याही प्रकारची दादपुकार घेण्यास तयार नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नुकतेच सुमारे पाच तास ठिय्या आंदोलन केले. मुख्य प्रवेशद्वार बंद करून प्रशासनाला हस्तक्षेप करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु, शेतकऱ्यांच्या आंदोलनाची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे केळी उत्पादकांनी रास्ता रोको आंदोलनाचा मार्ग निवडला. त्यानंतर कुठे प्रशासनाने बुधवारी (ता. 14) बैठक घेऊन योग्य तो तोडगा काढण्याची ग्वाही दिली. दरम्यान, केळी उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हा पीकविमा तक्रार निवारण समिती, वीमा कंपनीचे प्रतिनिधी तसेच कृषी विभागाला उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगरातील खंडपीठात उभे करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली आहेत. शेतकऱ्यांच्या बाजुने पीकविमा कंपनीने योग्य तो निर्णय तातडीने न दिल्यास उच्च न्यायालयाच जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बुधवारच्या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

WhatsApp Group
Previous articleविदर्भासह मराठवाड्यात आज शनिवारी विजांसह पावसाचा येलो अलर्ट
Next articleगाव चलो अभियानातून कृषी कल्याणासाठी राबविलेल्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार