दक्षिण भारतात मिचौंग चक्रीवादळाचे थैमान; महाराष्ट्रातही वाढली चिंता

Cyclone Michaung : काल सोमवारी (ता.04) दक्षिण भारतात धडकलेल्या मिचौंग चक्रीवादळाने तमिळनाडूमध्ये अक्षरशः थैमान घातले. रेल्वे स्थानकासह विमानतळ तसेच शहरातील रस्त्यांवर सगळीकडे पाणी पसरल्याने जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. चेन्नईमध्ये पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला. हे चक्रीवादळ आज मंगळवारी (ता.05) दुपारी आंध्रप्रदेशातील नेल्लोर आणि मच्छलीपट्टनम भागात धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही त्यामुळे चिंता वाढली आहे.

Cyclone Michoung in southern India; Worry also increased in Maharashtra

मिचौंग चक्रीवादळामुळे तमिळनाडू राज्यात गेल्या 80 वर्षात कोसळला नाही, एवढा पाऊस एकाच दिवसात कोसळला. त्यामुळे जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी पसरले. तेथील नागरिकांना सुरक्षेचा उपाय म्हणून आता सुरक्षितस्थळी स्थलांतरीत केले जात आहे. वादळी पावसामुळे घरांमध्ये तसेच व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये अचानक पाणी शिरल्याने अनेकांना मोठा आर्थिक मोठा फटका त्यामुळे बसला आहे. काही ठिकाणी तर पावसाच्या पाण्यामुळे अकस्मात पूर आल्याने लहान व मोठी वाहने पाण्यात वाहून गेली आहेत. दरम्यान, मिचौंग चक्रीवादळ आता आंध्रप्रदेशाकडे कूच करत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता कृष्णा, पश्चिम गोदावरी, कोनसीमा, काकीनाडा, बापटला, प्रकाशम, नेल्लोर, तिरूपती आदी जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातही पावसाची हजेरी लागणार

दक्षिण भारतातील तमिळनाडू तसेच आंध्रप्रदेशात धुमाकूळ घालणाऱ्या मिचौंग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातही चिंता वाढली आहे. कारण, नुकत्याच कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे आधीच महाराष्ट्रात खूप मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाने महाराष्ट्र राज्यात काही भागात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मिचौंग चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर विशेष काही परिणाम जाणवणार नसल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

WhatsApp Group
Previous articleजळगावमध्ये उद्यापासून सात दिवस श्री शिव महापुराण कथेची पर्वणी
Next articleमहाराष्ट्रातील साखर उत्पादन ‘या’ कारणाने घटण्याची शक्यता