Dairy Farming : पर्जन्यमान घटल्याने सर्वदूर पशुधनाचा चारा व पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला असताना, जळगाव जिल्ह्यातील काही पशुपालकांनी गोठ्यातील वाया जाणाऱ्या सांडपाण्यावर शेती फुलविण्याचा प्रयत्न केला आहे. खेडी खुर्द येथील पशुपालक श्री.अनंत खडसे यांनी तर सांडपाण्यावर गाई व म्हशींच्या चाऱ्याचे उत्पादन घेऊन वैरणीवरील खर्चात मोठी बचत करून दुग्ध व्यवसाय नफ्यात आणण्याची किमया साधली आहे.
How to produce abundant green fodder on waste water?
अनंत खडसे यांच्या गोठ्यात सध्या गाई तसेच म्हशींचे मिळून दोन्ही वेळचे सुमारे 1000 लिटर दूध उत्पादन आहे. प्रामुख्याने जळगाव शहरात त्यांच्या दुधाचे मोठ्या संख्येने ग्राहक असून, त्यांनी दुधाचा संतुष्टी ब्रॅन्डही विकसित केला आहे. याशिवाय त्यांची मू. जे. महाविद्यालय परिसरात स्वतःची डेअरी सुद्धा आहे. पूर्वी डेअरी फार्मची जागा वगळता चारा पीक घेण्यासाठी त्यांच्याकडे एकरभरसुद्धा शेती नव्हती. त्यामुळे त्यांना हिरवा व कोरडा बाराही महिने चारा बाहेरुन विकत आणावा लागायचा. त्यावेळी नुसत्या हिरव्या चाऱ्यावरच त्याचे 2500 रुपये टनाप्रमाणे रोजचे साडेसात हजार रुपये खर्च व्हायचे. दूध उत्पादनासाठी होणाऱ्या खर्चात हिरव्या चाऱ्यावरील खर्चाचे प्रमाण जवळपास एक चतुर्थांश इतके होते. हे लक्षात घेऊन अनंत यांनी गोठ्यातील सांडपाण्यावर हिरव्या चाऱ्याचे पीक घेण्याचा निर्णय घेतला. खडसेंच्या गोठ्यात गाई व म्हशींना दररोज दोनवेळा पाण्याने धुतले जाते. सर्व सांडपाणी गोठ्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी गटाराची व्यवस्था देखील केलेली आहे. गोठ्यातील सांडपाणी वाया जाऊ न देता त्याचा पुरेपुर वापर करण्याच्या उद्देशाने गोठ्यालगत 35 फूट रुंद, 50 फूट लांब आणि साडेचार फूट खोल आकाराचे सिमेंटचे दोन हौद त्यांनी बांधून घेतले आहेत. पैकी एका हौदात शेणाची स्लरी तर दुसऱ्या हौदात फक्त मलमूत्र मिश्रित पाणी जमा होते. पाणी उचलण्यासाठी पाच अश्वशक्तीचा मड पंप त्याठिकाणी बसवून घेतला आहे. चारा लागवडीसाठी भाडे कराराने घेतलेल्या शेतात तसेच स्वमालकीच्या शेतात सर्व सांडपाणी पोचविण्यासाठी पाईपलाईन त्यांनी करून घेतली आहे.
![](https://gavshivar.news/wp-content/uploads/2023/11/Untitled-357.jpg)
दूध उत्पादन वाढले, चाऱ्याच्या खर्चात बचत
अनंत खडसे यांनी गोठ्यातील सांडपाणी शेतात सोडण्याची सोय झाल्यानंतर लगेचच फुले यशवंत, बायफ 10, डीएचएन 6 आदी जातीचे हिरव्या चाऱ्याचे ठोंब जानेवारी 2016 मध्ये पाच एकर शेतीत लावले होते. ठोंब लागवडीनंतर पुढील सलग तीन वर्षे चारा उत्पादन त्यांना घेता आले. शेण व मूत्र यांचे मिश्रण असलेल्या पाण्यामुळे चारा पिकाची लागवडीपासूनच जोमदार वाढ होत असल्याचे दिसून आले. लागवडीनंतर साधारणतः तीन महिन्यांनी पहिली कापणी मिळाली. त्यापासून त्यांना दररोज एक टन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळू लागले. पावसाळा सुरु झाल्यावर चारा उत्पादनात दुपटीने वाढ झाली. दैनंदिन सरासरी सुमारे दोन टनापर्यंत हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळू लागल्याने त्यांना अडीच हजार रुपये टनाप्रमाणे रोजचे 5 हजार रुपये म्हणजे महिन्याकाठी सुमारे 1.5 लाख रुपये खर्च कमी करणे शक्य झाले. गरज पडली तेव्हा चारा कापून आणता येत असल्याने अनिश्चितता संपून दूध उत्पादनात सातत्य राखणेही त्यांना शक्य झाले. वैरणीसाठी बारमाही उसाच्या वाढ्यांचा वापर झाल्याने ऑक्झीलेट ऍसीडची बाधा होऊन जनावरांची हाडे ठिसूळ होणे, वेळेवर माजावर न येणे तसेच गाभण न राहणे, अशा बऱ्याच समस्यांना तोंड देण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. त्यापासून सुटका करुन घेण्याकरीता गोठ्यातील सांडपाण्यावर स्वतः हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घेणे त्यांच्यासाठी खूपच फायद्याचे ठरले.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)