शेतकरी थेट अ‍ॅमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्टला शेतमाल विकणार

गावशिवार न्यूज | कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठकीत झालेल्या महत्वाच्या सामंजस्य करारानुसार राज्यातील शेतकरी आता थेट अ‍ॅमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्ट यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना त्यांचा शेतमाल विकू शकणार आहेत. राज्य सरकारने कृषी मूल्य साखळीचा दुसरा टप्पा आता प्रारंभ केला आहे. सबसिडीतून तसेच नुकसान भरपाईतून शेतीचे क्षेत्र बाहेर काढण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (Devendra Fadanvis)

कृषी विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प तसेच ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन (VSTF) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठक -2024 मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित केली होती. त्यात श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनूप कुमार, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यासह विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांचे प्रतिनिधी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन व ओएनडीसी यांच्यात सामंजस्य करार झाला. शेतकऱ्यांची उत्पादने डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणून त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सदरचा करार करण्यात आला आहे.

WhatsApp Group
Previous articleमंगळवार (ता. 30 जानेवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव
Next articleकृषी विद्यापीठांच्या माध्यमातून विकसित भारत घडविण्याचे स्वप्न पूर्ण होणार