नमो शेतकरी महासन्मान योजना, दुसऱ्या हप्त्यापोटी 1 हजार 792 कोटी रुपये निधी

Dhananjay Munde : राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी 1 हजार 792 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदरचा निधी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्याद्वारे राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे रक्कम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जमा करण्यात येणार असल्याची माहिती श्री. मुंडे यांनी दिली आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत प्रत्येक वर्षात पीएम किसानच्या सोबतीला नमो शेतकरी महासन्मान योजनेतून लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6 हजार याप्रमाणे रक्कम देण्यात येत आहे.

राज्यात नमो शेतकरी महा सन्मान योजनेची घोषणा झाल्यानंतर कृषी विभागाने एक विशेष मोहीम राबवून योजनेसाठी पात्र असूनही काही तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची व त्रुटींची पूर्तता केली. त्यामुळे राज्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत सुमारे 13 लाखांची वाढ झाली आहे.

एप्रिल ते जुलै 2023 कालावधीत वितरीत झालेल्या पहिल्या हप्त्यापोटी सुमारे 1 हजार 720 कोटी रुपये निधीचे वितरण राज्यातील सुमारे 86 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यात आले होते. त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर 2023 या दुसऱ्या हप्त्यासाठी आता 1 हजार 792 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला असून, त्याचा लाभ राज्यातील जवळपास ९० लाख शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती श्री. मुंडे यांनी दिली.

WhatsApp Group
Previous articleगुरूवार (ता. 22 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव
Next articleनैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी 106 कोटींच्या निधीला मान्यता