Dhule Railway Station : धुळे येथील ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाला 9.45 कोटी रूपये निधीतून चालना

Dhule Railway Station : अमृत भारत योजनेच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या धुळे येथील स्थानकाचा सुमारे 9.45 कोटी रूपये खर्चून सध्या पुनर्विकास केला जात आहे. त्याअंतर्गत होत असलेल्या बऱ्याच कामांना आता गती मिळाली असून, या रेल्वे स्थानकाचा त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात चेहरामोहराच बदलून जाणार आहे. या स्थानकावरील नवीन सुविधांचा लाभ लवकरच प्रवाशांना मिळू शकणार आहे.

केंद्र सरकारने अमृत भारत योजनेंतर्गत देशातील ठराविक रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे कार्य हाती घेतले आहे. त्यामध्ये मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील 15 स्थानकांचाही समावेश केलेला आहे. ब्रिटीश काळापासून वापरात असलेल्या धुळे येथील रेल्वे स्थानकाचा देखील अमृत भारत योजनेतून कायापलट केला जात आहे. सध्या धुळे स्थानकावरील फिरत्या क्षेत्रासाठी फुटपाथ तोडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. स्थानकाच्या सीमेवरील भिंतीसाठी ग्राऊंड बीम कास्टिंगचे काम करण्यात आले आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंग क्षेत्राचे सपाटीकरण झाले आहे. याशिवाय परिभ्रमण क्षेत्राचे बांधकाम, वॉल कंपाऊंडचे बांधकाम, प्रवेशद्वारासाठी स्टील कटींग आणि उभ्या कॉलमचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. धुळे स्थानकावरील जुन्या इमारतीला सुद्धा नवी लूक देण्यात येत आहे. पूर्वीच्या स्थानकाची उंची खूपच कमी होती, ती आता वाढविण्यात येत आहे. याव्यतिरिक्त या स्थानकावर उत्तम प्रकाश व्यवस्था निर्माण केली जाणार आहे, विशेष म्हणजे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे रूंदीकरण करण्यात येणार आहे. स्वच्छतागृहांमध्ये सुधारणा केली जाणार असून, प्रवाशांसाठी वेटिंग रूम उभारण्यात येणार आहे.

मुंबईकडे जाणारी गाडी सुरू झाल्यानंतर प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ

पूर्वी, धुळे ते चाळीसगाव दरम्यान फक्त पॅसेंजर गाडी धावत असे. त्यामुळे धुळे येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांची पाहिजे तशी वर्दळ राहत नसे. मात्र, धुळे येथून मुंबईसाठी नुकतीच स्वतंत्र रेल्वे गाडी सुरू झाल्यानंतर या स्थानकावरील प्रवाशांची संख्या आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याशिवाय मध्य रेल्वेच्या महत्वपूर्ण अशा स्थानकांमध्ये धुळे स्थानकाचा समावेश झाला आहे, ज्याठिकाणी अमृत भारत योजनेतून सुमारे 9.45 कोटी रूपये खर्चून विविध विकास कामांना चालना देण्यात आली आहे.

WhatsApp Group
Previous articleजळगाव जिल्ह्यासाठी ६४८ कोटी रूपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्याला मंजुरी
Next articleWeather Update : खान्देशातील ‘या’ दोन जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी पावसाची शक्यता