जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी भागाची केंद्रीय पथकाकडून गुरुवारी पाहणी

Drought In Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने गुरुवारी (ता.14) चाळीसगाव तालुक्याला प्रातिनिधीक भेट दिली. पथकातील सदस्यांनी शेतकऱ्यांची विचारपूस करून त्यांच्याकडून आवश्यक ती माहिती देखील जाणून घेतली. दरम्यान, केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त मदत मिळावी, अशी अपेक्षा जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केंद्रीय पथकाकडे व्यक्त केली.

Inspection of the drought prone area of ​​Jalgaon district by the central team on Thursday

जळगाव जिल्ह्यात आलेल्या केंद्रीय पथकात केंद्रीय पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त एच.आर.खन्ना, सांख्यिकी विभागाचे सहायक संचालक जगदीश शाहू यांचा समावेश आहे. चाळीसगाव दौऱ्यापूर्वी धुळे येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, फैजपूरच्या प्रांताधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी देवयानी यादव, रोहयोचे उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जिल्हा कृषी अधीक्षक चंद्रकांत पाटील, चाळीसगावचे प्रांताधिकारी प्रमोद हिले, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य लेखाधिकारी महेश अवताडे, पशुसंवर्धन विभागाचे डॉ.गर्जे, कृषी तंत्र अधिकारी दीपक ठाकूर, गणपत डोंगरे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी पथकाला सांगितले की, जळगाव जिल्ह्यात फक्त चाळीसगाव तालुकाच नाही तर उर्वरित सर्व तालुक्यांतही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांना खरीप पिकांची दुबार पेरणी करावी लागली आहे. कापसाबरोबरच खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. जिल्ह्यात 1 लाख 16 हजार 720 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली होती, एकूण पीक क्षेत्राशी हे प्रमाण 73 टक्के आहे. जिल्ह्यात सरासरीच्या 92 टक्के पाऊस झाला आहे. चाळीसगाव तालुक्यात हेच प्रमाण जिल्ह्यातील सर्वात कमी 73 टक्के आहे. जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत जिल्ह्यात चार वेळा पावसाचा 8 ते 34 दिवसाचा खंड पडला आहे. जिल्ह्यात मोठे व लघु असे 16 पाटबंधारे प्रकल्प आहेत. यापैकी फक्त 10 प्रकल्पात 75 ते 100 टक्क्यांपर्यंत पाणीसाठा उपलब्ध आहे. चाळीसगाव तालुक्यात सध्या 13 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पुरेशा पाण्याअभावी पिके करपली आहेत. जनावरांसाठी चाऱ्याची कमतरता जाणवत आहे. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. तेव्हा केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी जास्तीत मदत मिळावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रीय पथकाकडे केली. तेव्हा दुष्काळी पाहणी केल्यानंतर सविस्तर अहवाल केंद्र शासनाकडे लवकरात लवकर सादर केला जाईल, अशी ग्वाही पथकातील सदस्यांनी यावेळी दिली.

केंद्रिय पथकाने यांच्या शेतांची केली पाहणी
दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या केंद्रिय पथकाने चाळीसगाव तालु्क्यातील बिलाखेड येथील शेतकरी नीलाबाई अनिल चौधरी यांच्या शेतातील मक्याची तसेच चंद्रकांत किसन चौधरी व भीमराव बाजीराव चौधरी यांच्या शेतातील कपाशीची पाहणी केली. याशिवाय डोणदिगर येथील शेतकरी बारकू शिवराम मोरे आणि भाऊसाहेब काशिनाथ पाटील यांच्या शेतातील कपाशीची पाहणी पथकाकडून करण्यात आली. हिरापूर येथील शेतकरी आबासाहेब रामदास देवरे यांच्या कपाशीची त्याचप्रमाणे सुदाम पंडित पाटील निकुंभ यांच्या केळी बागेची देखील केंद्रिय पाहणी पथकाने केली.

WhatsApp Group
Previous articleबऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत सतराशे विघ्न
Next articleदुबईतील ‘कॉप 28’ परिषदेत जळगावच्या जैन इरिगेशनचा सहभाग