राज्यातील दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी केंद्राचे पथक पाहणी करणार

Drought In Maharashtra : राज्य शासनाने 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यात उद्भवलेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित दुष्काळग्रस्तांना तातडीची मदत उपलब्ध व्हावी म्हणून केंद्र सरकारकडे रितसर अहवाल पाठविला होता. त्यानुसार 12 उच्च पदांवरील अधिकाऱ्यांचा समावेश असलेले पथक राज्यात पाहणी करण्यासाठी येत असून, दुष्काळी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठी मदत जाहीर होण्याची शक्यता त्यामुळे वाढली आहे.

The central government team will inspect to provide relief to the drought victims of the state

राज्यातील दुष्काळी स्थितीचे अवलोकन करून राज्य शासनाने यापूर्वीच दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातही संपूर्ण दुष्काळ झाला आहे. याशिवाय उर्वरित 14 तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर झाली आहे. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी येणारे पथक प्रातिनिधीक स्वरूपात काही भागातीलच दौरा करणार आहे. या पथकाकडून पाच दिवसांच्या दौऱ्यानंतर हाती आलेल्या माहितीचा अहवाल केंद्रिय समितीसमोर ठेवला जाईल. दुष्काळग्रस्तांना अपेक्षित असलेली मदत देण्याच्या हिशेबाने आवश्यक ती शिफारस देखील दुष्काळ पाहणी पथकाकडून केंद्र सरकारला केली जाईल.

दुष्काळ पाहणी पथकात यांचा असेल समावेश
राज्यातील दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी येणाऱ्या पथकाचे नेतृत्व केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सहसचिव प्रिय रंजन करतील. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पथकात केंद्रिय कृषी मंत्रालयाचे अवर सचिव के.मनोज, केंद्रिय पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे सहआयुक्त डॉ. एच.आर.खन्ना, कापूस विकास संचालनालयाचे संचालक डॉ.ए.एल.वाघमारे, पुसा येथील राष्ट्रीय पीक हवामान केंद्राचे उपसंचालक डॉ. सुनील दुबे, कृषी मंत्रालयाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास विभागाचे सल्लागार चिराग भाटिया, केंद्रिय खर्च विभागाचे सहसंचालक जगदीश साहू, नीती आयोगाचे संशोधन अधिकारी शिवचरण मीना, केंद्रिय पेयजल व स्वच्छता खात्याचे अतिरिक्त सल्लागार ए.मुरलीधरन, केंद्रिय जलस्त्रोत विभागाच्या संनियंत्रण व मूल्यमापन संचालनालयाचे संचालक हरीश उंबरजे, ग्रामीण खाते प्रशिक्षण विभागाचे उपसचिव प्रदीप कुमार, केंद्रिय खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे अवर सचिव संगीत कुमार आदींचा समावेश असेल.

WhatsApp Group
Previous articleकापसाला 14 हजार रू. प्रतिक्विंटल भाव मिळालाच पाहिजे : विरोधकांची मागणी
Next articleजळगाव ते मनमाड तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम 75 टक्के पूर्ण