गावशिवार न्यूज | अवकाळी पाऊस, गारपीट तसेच सततच्या ढगाळ वातावरणाचा मोठा फटका यंदा राज्यातील शेवगा शेतीला बसला आहे. प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात मोठी घट झाल्याने बाजारात शेवग्याच्या शेंगांनी त्यामुळे चांगलेच नाव काढले आहे. मागणीनुसार आवक होत नसल्याने पुण्यासह साताऱ्यात शेवग्याचे दर सुमारे 8000 रूपये प्रतिक्विंटलपर्यंत गेले आहेत.
Drumstick Market
शेवग्याच्या शेगांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, अमीनो ॲसीड, बीटा कॅरटीन, कॅल्शियम, फायबर, सोडियम यासह इतर अनेक शरीराला आवश्यक असणारे पौष्टीक घटक आढळतात. त्यामुळे शेवग्याच्या शेंगांचा आहारात समावेश करण्याविषयी डॉक्टर व आहारतज्ज्ञ सल्ला देतात. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता शेवगा शेतीकडे अनेक शेतकरी देखील वळले आहेत. मात्र, वातावरणातील ऊन, वारा, पाऊस, थंडी आदी नैसर्गिक घटकांच्या बदलास लगेच बळी पडणारे शेवगा पीक जोपासणे अलिकडे खूपच जिकिरीचे ठरू लागले आहे. त्याचा प्रत्यय यंदाच्या हंगामातही आला असून, सततच्या प्रतिकूल हवामानामुळे शेवगा शेतीचे पार बारा वाजले आहेत. संबंधित सर्व शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी (ता.02 जानेवारी) राज्यभरात शेवगा शेंगांची 332 क्विंटल आवक झाली होती. पैकी मुंबई बाजार समितीत सर्वाधिक 188 क्विंटल आवक झाली आणि 5500 ते 6500 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. पुण्यातही शेवगा शेंगांची 77 क्विंटल आवक झाली, त्यास 6000 ते 8000 रूपये आणि 4000 ते 6500 रूपये प्रतिक्विंटल असे दोन भाव मिळाले. साताऱ्यात 15 क्विंटल आवक झाली, त्यास 7000 ते 8000 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. ठाण्यात शेवगा शेंगांची फक्त 3 क्विंटल आवक झाली, त्यास 6800 ते 7400 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. जळगाव बाजार समितीमध्ये शेवगा शेंगांना सरासरी 6000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.