Egg Rate : राज्यात डिसेंबर महिन्याच्या अखेरीस अंड्यांचे दर 6.72 रूपये प्रतिनग आणि 201.6 रूपये प्रति ट्रे (30 नग) झाल्यामुळे ग्राहकांच्या तोंडाचे पाणी पळाले होते. मात्र, यथावकाश अंड्यांच्या दरातील तेजी आता कमी झाली असून, गेल्या चार दिवसांपासून अंड्यांचे होलसेल दर स्थिरावल्याचे दिसून आले आहे.
NATIONAL EGG CO-ORDINATION COMMITTEE म्हणजेच एनईसीसीद्वारे जाहीर करण्यात आलेल्या दरानुसार, साधारण 29 डिसेंबरपर्यंत नवीन वर्षाच्या अनुषंगाने मागणी वाढल्यानंतर राज्यात अंड्यांचे दर 672 रूपये प्रतिशेकडा होते. अर्थात, होलसेलमध्ये अंड्याच्या दरात मोठी तेजी निर्माण झाल्याने किरकोळ बाजारातही अंड्याचा दर 10 रूपयांपर्यंत पोहोचला होता. त्याचा मोठा परिणाम विविध शहरांमध्ये पाव आमलेट तसेच अंडा भुर्जी व उकळलेली अंडी विकणाऱ्या विक्रेत्यांच्या व्यवसायावर देखील झाला होता. कारण, महागाई वाढल्याने अंड्यांपासून तयार होणाऱ्या खाद्य पदार्थांच्या किमतीत वाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नव्हता. सुदैवाने नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर वाढलेली मागणी आटोक्यात येताच अंड्यांचे दर पुन्हा कमी झाले. त्यात आजतागायत कोणतीच वाढ किंवा घट झालेली नाही. सद्यःस्थितीत अंड्यांचे होलसेल दर 6.5 रूपये प्रतिनग, 195 रूपये प्रति ट्रे, 650 रूपये प्रति शेकडा आणि 1365 रूपये प्रति पेटी आहेत.
किरकोळ बाजारात एका अंड्याचा दर 8 रूपये
दरम्यान,अंड्यांचे होलसेल दर सध्या स्थिर असले तरी किरकोळ बाजारात अंड्याचा दर अजुनही 8 रूपये प्रतिनग आहे. त्यावर ग्राहकांकडून प्रति अंडे साधारण दीड रूपयांचा नफा किरकोळ अंडी विक्रेते वसूल करीत आहेत. ज्यांना महागाईमुळे मटन, मच्छी किंवा चिकन खाणे परवडत नाही, त्यांच्यासाठी अंडा करी किंवा अंडा भुर्जी हेच प्रोटिनयुक्त जेवण असते. मात्र, किरकोळ विक्रीचे दर वाढल्यानंतर अंडी खाऊन दिवस काढणाऱ्यांची मोठी पंचाईत होऊन बसली आहे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)