गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेसाठी 23.37 कोटींची तरतूद

Farmer Accident Scheme : राज्यात ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांस सुमारे 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. याच योजनेसाठी शासनाने नुकतीच सुमारे 23.37 कोटी रूपयांची तरतूद केली आहे.

रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना किंवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदंश, नक्षलाईटकडून झालेल्या हत्या, जनावरांच्या खाल्ल्यामुळे/चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू आणि दंगल आदी कारणांमुळे शेतकरी दगावल्यास त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतून आर्थिक सहाय्य केले जाते.

योजनेच्या लाभासाठी अर्जासोबत जोडावी लागतात ही सर्व कागदपत्रे
या योजनेसाठीच्या अर्जासोबत मृत्यूचे कारण स्पष्ट करणारी सरकारी कागदपत्रे ज्यात FIR, मेडिकल रिपोर्ट, पोस्टमॉर्टम रिपोर्ट जोडणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्याचे वारस म्हणून तलाठ्याकडील गाव नमुना नंबर 6 क नुसार वारसाची नोंद, शेतकऱ्याच्या वयाची खात्री होईल यासाठी त्याचे आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र, मृत्यूचा प्रथम माहिती अहवाल (FIR) किंवा स्थळ पंचनामा किंवा पोलीस पाटलाचा अहवाल, वारसदाराचे आधार कार्ड आणि बँक पासबूक.

अर्ज कुठे आणि कसा करायचा ?
शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यूच्या 30 दिवसाच्या आत त्याबाबतचा प्रस्ताव संबंधित कुटुंबाने तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जमा करायचा आहे. एका साध्या कागदावर अपघाताविषयीची सविस्तर माहिती लिहून अर्ज करायचा आहे. यात स्वत: बद्दलची माहिती लिहून मग मृत शेतकऱ्याचे नाव, त्यांच्यासोबतचे नाव, मृत व्यक्तीच्या मृत्यूचे कारण, तारीख लिहायची आहे. अपघातात मृत्यू झाला की अपंगत्व आले, तेही लिहायचे आहे. पुढे ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ लाभ मिळावा, असेही लिहायचं आहे. ही प्राथमिक माहिती प्राप्त झाल्यानंतर महसूल, पोलिस आणि कृषी अधिकाऱ्यांचे पथक प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देवून चौकशी करेल. 8 दिवसांच्या आत आपला अहवाल तहसीलदारांना देईल. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समिती 30 दिवसांच्या आत शेतकरी कुटुंबाला मदत देण्याबाबत निर्णय घेईल.

WhatsApp Group
Previous articleबुधवार (ता. 21 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव
Next articleगुजरातमध्ये कापसाला ‘या’ ठिकाणी 7,715 रूपये प्रति क्विंटल मिळाला दर