नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शुक्रवारी जाहीर करणार मोठे पॅकेज ?

Farmers Crisis : राज्यातील शेतकरी दुष्काळासह अवकाळी पाऊस, गारपीट तसेच वादळामुळे पार मेटाकुटीला आला आहे. संबंधित सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी मोठे पॅकेज जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी खुद्द त्यास दुजोरा दिला आहे.

भर हिवाळ्यात कोसळलेला अवकाळी पाऊस तसेच गारपीट व वादळी वाऱ्यांमुळे राज्यातील शेतकऱ्यांचा हातातोंडाशी घास हिरावला गेला आहे. अपुऱ्या पावसामुळे आधीच खरीप हंगाम वाया गेला होता, त्यात अवकाळीने रब्बीची आशा संपवली. वेचणीवर आलेला कापूस आडवा पडल्याने विदर्भ, मराठवाडा तसेच खान्देशात मोठे नुकसान झाले. याशिवाय केळी, पपईच्या बागा जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात कोलमडून पडल्या. नाशिक जिल्ह्यात काढणीसाठी तयार द्राक्ष बागा तसेच कांदा पिकाची अतोनात हानी झाली. कोकणात आंब्याचा मोहोर गळून पडला. विदर्भातही तूर, सोयाबीन, कांदा पिकांचे नुकसान झाले. अवकाळीच्या कहरापासून एकही जिल्हा वाचलेला नाही. दुष्काळामुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांना आधीच कोणतीही मदत मिळालेली नसताना, अवकाळी पाऊस व गारपिटीचा मार सहन करण्याची त्यांच्यावर वेळ आली. अशा या परिस्थितीत शासनाकडून आर्थिक मदत मिळण्याच्या आशेवर संबंधित सर्व नुकसानग्रस्त शेतकरी बसले होते. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही विरोधी पक्षांनी त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले होते.

आता मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अग्रीम पीकविमा भरपाई मिळण्यास झालेला विलंब लक्षात घेता, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई केव्हा मिळते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकसान भरपाई घोषीत करणार असले तरी नुकसानग्रस्तांना अशी किती आर्थिक मदत मिळते, त्याची सर्वांना उत्कंठा लागली आहे. आभाळच फाटले तर ठिगळ कुठे कुठे लावणार, अशी स्थिती निर्माण झालेली असताना शासनाची मदत शेतकऱ्यांना दिलासा तरी किती देणार आहे. मात्र, त्यामुळे नुकसानग्रस्तांना थोडाफार दिलासा मिळू शकणार आहे.

WhatsApp Group
Previous articleराज्यातील थंडीचा कडाका हळूहळू वाढतोय, विदर्भ गारठला
Next articleशेतकऱ्याने मुलीच्या नावाने नावारूपास आणला लोणच्याचा ‘सृष्टी’ ब्रॅन्ड