Farmers Crisis : राज्यातील शेतकरी दुष्काळासह अवकाळी पाऊस, गारपीट तसेच वादळामुळे हवालदिल झालेला असताना, संबंधित सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी मोठे पॅकेज जाहीर करणार असल्याचा दावा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात केला होता. प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांनी तसे कोणतेच पॅकेज अद्याप जाहीर न केल्याने शेतकऱ्यांचा मोठा भ्रमनिरास झालेला आहे.
The Chief Minister has not announced a package for the loss-affected farmers of the state
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अग्रीम पीकविमा भरपाई मिळण्यास झालेला विलंब लक्षात घेता अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई केव्हा मिळते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकसान भरपाई घोषीत करणार असल्याचे सांगण्यात आल्यानंतर नुकसानग्रस्तांना त्याची उत्कंठा लागली होती. परंतु, हिवाळी अधिवेशन संपण्याची वेळ आली तरी मुख्यमंत्र्यांनी नुकसानीची मदत देण्यासंदर्भात एक अवाक्षर सुद्धा अजूनपर्यंत काढलेले नाही. याशिवाय विधीमंडळाच्या या अधिवेशनात शेतकऱ्यांना जास्तीतजास्त मदत देण्यासाठी कोणतीच ठोस चर्चा सत्ताधारी आणि विरोधक यांनी आतापर्यंत केलेली नाही. येत्या दोन-तीन दिवसात अधिवेशनाचे सूप वाजणार आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसात तरी नुकसानग्रस्तांना मदत जाहीर होईल, अशी आशा संबंधित शेतकरी बाळगून आहेत.
शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली गेली पाने
सरासरीपेक्षा कमी पडलेल्या पावसामुळे आधीच खरीप हंगाम वाया गेला होता, त्यात अवकाळीने रब्बीची आशा संपवली. परंतु, दुष्काळामुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून कोणतीही मदत अद्याप मिळालेली नाही. शासनाकडून आर्थिक मदत मिळण्याच्या आशेवर संबंधित सर्व नुकसानग्रस्त शेतकरी हवालदिल होऊन बसले आहेत. परंतु, आजतागायत त्यांच्या तोंडाला पानेच पुसली गेली आहेत.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)