Flood Management Project : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुराचे पाणी दुष्काळी मराठवाड्याला देण्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वित्तसहाय्य करण्यासाठी जागतिक बँकेनं मंजुरी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा, या दोन्ही भागांना मोठा दिलासा देणारा हा प्रकल्प ठरणार आहे. सुमारे 400 दशलक्ष डॉलर्सच्या या प्रकल्पासाठी जागतिक बँक 280 दशलक्ष डॉलर्स तर राज्य सरकार 120 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 998 कोटी रुपयांचे योगदान देणार आहे.
दरवर्षीच्या पावसाळ्यात कोल्हापूर तसेच सांगलीतील पूर परिस्थिती खूपच बिकट होत असते. या पुराचे व्यवस्थापन आणि पावसाळ्यातील अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळविण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास जागतिक बँक अर्थसाहाय्य करणार आहे. 12 सप्टेंबर 2019 रोजी जागतिक बँकेच्या पथकाने कोल्हापूर व सांगलीच्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन पूर व्यवस्थापनावर सविस्तर चर्चा केली होती. पूरग्रस्त भागातील पाणी दुष्काळी भागात वळविण्याची ही योजना आता प्रत्यक्षात येणार आहे. त्यामाध्यमातून कृष्णा-भीमा नदी खोऱ्यात प्रगत तंत्रज्ञानाद्वारे कामे होतील. ज्यामाध्यमातून पूररेषा आखणे, नद्यांचे खोलीकरण आणि गाळ काढणे, अशी अनेक कामे हाती घेण्यात येणार आहेत. पावसाळ्यातील पुराचे अतिरिक्त पाणी मराठवाड्याकडे वळविल्याने दुष्काळी भागाला दिलासा मिळू शकणार आहे, तर पूर स्थितीमुळे अडचणीत येणाऱ्या कोल्हापूर, सांगलीला सुटकेचा निःश्वास सोडता येणार आहे.