अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांना आता दरवर्षी एक साडी मोफत मिळणार

Free Saree Scheme: राज्यातील अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका धारक कुटुंबांना आता दरवर्षी शासनाने निश्चित केलेल्या सणाला सुमारे 355 रूपये किंमतीची एक साडी मोफत वाटप होणार आहे. 2023 ते 2028, या पाच वर्षांच्या कालावधीसाठी सदरची योजना राबविण्यात येणार असून, सुमारे 24 लाख 58 हजार 747 अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांना त्याचा लाभ मिळणार आहे.

Antyodaya ration card holder families will now get one saree free every year

राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करून देण्याची कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्याअनुषंगाने 02 जून 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्याचे एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023/28 जाहीर करण्यात आले आहे. सदर धोरणाची अंमलबजावणी करताना अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली प्रति कुटुंब एक साडी मोफत वाटप करण्याची योजना सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबानाच फक्त या योजनेचा लाभ मिळणार आहे. अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण विभागाने दिलेल्या आकडीवारीनुसार 31 डिसेंबर 2022 पर्यंत राज्यात अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांची संख्या तब्बल 24,58,747 इतकी आहे. दरवर्षी अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांच्या संख्येत वाढ अथवा घट होण्याची शक्यता आहे. त्यांच्या संख्येनुसार सदर योजनेच्या लाभार्थी संख्येत वाढ किंवा घट होणार आहे.

रेशन दुकानांवर होईल मोफत साड्यांचे वितरण

मोफत साडी वाटपाच्या योजनेसाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादित, नवी मुंबई यांना नोडल संस्था म्हणून नेमण्यात आले आहे. हे महामंडळ राज्यातील नोंदणीकृत यंत्रमाग सहकारी संस्था, लघू उद्योग, मध्यम उद्योगांकडून साडीचे उत्पादन करून घेणार आहे. सन 2023/24 साठी सदर योजनेकरीता महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाने ई-निविदेद्वारे केलेल्या दर करारानुसार प्रति साडी किंमत महामंडळाच्या सेवाशुल्कासह 355 रूपये (अधिक 5 टक्के जीएसटी) निश्चित करण्यात आली आहे. लाभार्थी कुटुंबांना मोफत साड्यांचे वितरण राज्य शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशन दुकानांवर करण्यात येणार आहे.

WhatsApp Group
Previous articleजळगावमध्ये दिवाळीपूर्वीच झेंडुच्या फुलांना किरकोळ बाजारात 80 रूपये किलोचा भाव
Next articleशेताच्या बांधावर गावरान कोंबड्या पाळल्याने 35 हजार रूपये महिना कमाई